Mumbai-Surat Train: मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका! वापी-पारडीदरम्यान रेल्वे ट्रॅक खचला, मुंबई-सुरत रेल्वे वाहतूक विस्कळीत

गुजरातमधील मुसळधार पावसामुळे वापी-पारडीदरम्यान रेल्वे मार्गाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील अनेक गाड्या रद्द, वळविण्यात किंवा अंशतः चालविण्यात आल्या असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा

Mumbai-Surat Train: मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका! वापी-पारडीदरम्यान रेल्वे ट्रॅक खचला, मुंबई-सुरत रेल्वे वाहतूक विस्कळीत

गुजरात: गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही दिसून येत आहे. वापी आणि पारडी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे मार्गालगतचा भराव वाहून गेल्याने रेल्वे प्रशासनाला तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले. या घटनेमुळे मुंबई-सुरत मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

सलग दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गुजरातमधील वलसाड, नवसारी आणि सुरत परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसाचा फटका रेल्वे मार्गालाही बसला. वापी आणि पारडी स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळाखालचा मातीचा भराव आणि खडी वाहून गेल्याने सिग्नल यंत्रणेलाही धक्का बसला. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित मार्गावरील एका मुख्य रेल्वे लाईनवरील वाहतूक तात्पुरती बंद करून दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: Kolhapur Rain: कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरल्यानंतरही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ; राधानगरी धरण 80 टक्के भरले

सध्या या विभागात एकाच मार्गावरून रेल्वेची वाहतूक सुरू असल्याने अनेक गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचा प्रवास मधल्या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाने उंबरगाव-वलसाड मेमू सेवा रद्द केली आहे. तसेच बोरिवली-वलसाड, कर्णावती एक्सप्रेस, वडोदरा-डहाणू रोड, मुंबई सेंट्रल-वापी पॅसेंजर, सयाजीनगरी एक्सप्रेस आणि अजमेर-बांद्रा टर्मिनस या गाड्या त्यांच्या अंतिम स्थानकापर्यंत न धावता ठराविक स्थानकांपर्यंतच चालविण्यात येत आहेत. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंबही होत असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसारच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojna: रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींच्या उत्साहावर विरजण; अनेक महिलांचा हप्ता थांबला

दरम्यान, पालघर जिल्ह्यातही मंगळवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असली तरी पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र गुजरातमधील रेल्वे मार्गावरील दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत मुंबई-सुरत मार्गावरील काही गाड्यांवर परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत अपडेट्स तपासण्याचा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number