उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. याचपार्श्वभूमिवर भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील वातावरण गारठा जाणवायला मिळतो आहे.
यावेळी मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी पावसाची शक्यता नसून ढगाळ वातावरण राहिल ज्यामुळे धुके आणि गारवा जाणवेल. तर पुण्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस असून सकाळी धुके आणि थंड हवा जाणवण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 30 अंश, तर किमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भात नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. गोंदिया, अमरावती, वर्धा भागांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याने गारठा वाढल्यामुळे पुढील 3 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान खात्याने थंडीच्या लाटेचा अधिकृत इशारा जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान अधिक थंड राहणार आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून नागरिकांना पहाटे आणि रात्री तीव्र गारठ्याचा सामना करावा लागत आहे. मात्र डिसेंबरच्या अखेरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.