वर्धा जिल्ह्याचे पीक वैशिष्ट्य असलेली समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळद आता भारतीय टपालावर उमटली आहे. भारतीय टपाल खात्याकडून वायगावच्या वैशिष्ट्यपूर्ण हळदीला टपाल तिकिटांचा मान मिळाला आहे . ही हळद आता टपालाने देखील आपले गुणधर्म सर्वत्र पसरविणार आहे. डाक विभागाचा लिफाफा आणि तिकीट या दोन्हीवर ही हळद चित्र व वैशिष्ट्य रुपात असणार आहे.
वायगावच्या हळदीला समुद्रपूर तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून झळाळी देण्याचा प्रयत्न होत आहे. सहा महिन्यांत तब्बल साठ लाखांची उलाढाल हे बचत गट करतात. समुद्रपूर तालुक्यात ७०० मेट्रिक टन इतके हळदीचे उत्पादन होते. यातही वायगावच्या हळदीची प्रसिद्धी सातासमुद्रापार पोहचली आहे. या गावातील हळद आहारासोबतच संस्कारातही वापरली जाते. सर्वाधिक औषधी गुणधर्मामुळे ही हळद अनमोल ठरली आहे. हळदीच्या प्रचार – प्रसारात वायगाव हळद कुठे कमी पडते काय? यासाठीच प्रयत्न केले जात आहे.
फार्मर प्रोड्युसर कंपनी, डी आर डी ए, आत्मा व बचत गटांनी भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने टपालाच्या माध्यमातून वायगगावची हळद सातासमुद्रापार पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. वायगाव हळदीचे गुणधर्म ओळखून आधीच वायगाव हळदीला भौगोलिक नामांकन मिळवून घेतले आहे. प्रोड्युसर कंपनीचे प्रशांत भगत यांनी डाक विभागाकडे अशा प्रकारच्या हळद उत्पादनाला टपाल तिकिटावर मान मिळण्यासाठी प्रस्तावित केले होते.
‘अतुल्य भारत की अमुल्य निधी’ ही संकल्पना भारतीय डाक खात्याकडून राबविली जात आहे. या अंतर्गत ज्या ज्या भागात जे जे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असेल त्याची प्रसिद्धी टपाल तिकिटांच्या माध्यमातून केली जाते. वायगाव येथील हळद उतपादन देखील टपाल तिकिटावर उमटले आहे. याशिवाय हे उत्पादन कसे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे याची माहिती देखील दिली आहे. वायगाव हळदीचे चित्र टपालावर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हळदीची गुणधर्म तसेच इतर महत्वपूर्ण माहिती नोंद करण्यात आली आहे.