मुंबई: 100 दिवसांच्या ‘चक्रव्यूह’नंतर आणि अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर ‘बिग बॉस मराठी 6’च्या मंचावर विजेत्याच्या नावाची मोहोर उमटली. डोळ्यांत आनंदाश्रू आणि हातात चमचमती ट्रॉफी घेत तन्वी कोलतेने यंदाच्या पर्वावर तिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले. पण, जसं म्हणतात की ‘पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त!’, तसाच काहीसा प्रकार महाअंतिम सोहळ्यानंतर पाहायला मिळाला. विजेतेपद तन्वीने मिळवले असले, तरी या विजयाच्या झगमगटात स्वतःचीच पाठ थोपटून घेत लक्ष वेधून घेण्याची हुशारी विशाल कोटियनने अचूक साधली आहे.
यंदाच्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासून अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. तन्वी कोलतेने तिच्या संयमी आणि चतुरस्र खेळाच्या जोरावर ‘बिग बॉस मराठी 6’च्या विजेतेपदाला गवसणी घातली. महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या राकेश बापट आणि विशाल कोटियन यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र, संपूर्ण सीझनभर स्वतःच्या खेळावर अफाट विश्वास असणाऱ्या विशाल कोटियनचा आत्मविश्वास घराबाहेर पडल्यावरही तिळमात्र कमी झालेला नाही. पापाराझींसमोर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेतून त्याचा हाच बेधडक अंदाज पुन्हा एकदा दिसून आला.
महाअंतिम सोहळ्यानंतर जेव्हा विशालने माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा त्याला अनेक तिरकस प्रश्न विचारण्यात आले. “सुरुवातीच्या पाच-सहा आठवड्यांत तुम्हीच विजेते वाटत होतात. पण, तन्वी आणि राकेशला तुम्हीच इतकं मोठं केलं नसतं, तर कदाचित चित्र वेगळं असतं,” असा थेट सवाल पापाराझींनी केला. यावर कोणतीही खंत किंवा नाराजी व्यक्त न करता, अत्यंत दिलखुलासपणे विशालने या प्रश्नाला सामोरे जाणे पसंत केले.
विशालने अत्यंत परिपक्व खेळाडूची वृत्ती दाखवत म्हटले की, “हा एक खेळ आहे, त्यात पश्चात्ताप कशाला हवा? तन्वी आणि राकेश दोघेही खूप छान खेळले. जर हा पाच-सहा दिवसांचा गेम असता, तर साहजिकच मीच जिंकलो असतो. पण हा 14 आठवड्यांचा मोठा प्रवास आहे. ज्याने हा 100 दिवसांचा खेळ पूर्ण केला आणि जो टिकून राहिला, तो प्रत्येक जण विजेताच आहे.” पुढे तो मिश्किलपणे म्हणाला, “मी एक ‘स्पोर्ट्सपर्सन’ आहे. त्यामुळे हार-जीत याने मला फारसा फरक पडत नाही. मी टॉप 3 मध्ये पोहोचलो, आता ‘बच्चे की जान लोगे क्या?'” या त्याच्या विधानाने उपस्थितांची चांगलीच दाद मिळवली.
या संवादादरम्यान पापाराझींनी एका अत्यंत रंजक योगायोगाकडे विशालचे लक्ष वेधले. जेव्हा तो ‘बिग बॉस हिंदी 15’ मध्ये स्पर्धक होता, तेव्हा तेजस्वी प्रकाशने विजेतेपद पटकावले होते; आणि आता ‘बिग बॉस मराठी 6’ मध्ये तन्वी कोलतेने ट्रॉफी जिंकली. हा धागा पकडत विशालने हसत हसत उत्तर दिले, “म्हणजे मी मुलींसाठी ‘लकी चार्म’ आहे तर!” त्याच्या या एका वाक्याने संपूर्ण चर्चेचा रोखच बदलून टाकला. एकंदरीतच, तन्वीच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष सर्वत्र सुरू असतानाच, अत्यंत शिताफीने स्वतःला ‘लकी चार्म’ घोषित करत विशाल कोटियनने या चर्चेतही स्वतःचाच भाव वाढवून घेतला आहे.