Viral Video: गोरेगावातील हॉटेलमधील घाणेरडा प्रकार उघड; रोटीवर थुंकताना कुक कॅमेऱ्यात कैद, किळसवाणा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

मुंबईतील गोरेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये रोटीवर थुंकून ती ग्राहकांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Viral Video: गोरेगावातील हॉटेलमधील घाणेरडा प्रकार उघड; रोटीवर थुंकताना कुक कॅमेऱ्यात कैद, किळसवाणा व्हिडीओ प्रचंड व्हायरल

मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये रोटी बनवताना त्यावर थुंकून ती ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी हॉटेल मालक आणि संबंधित कुकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर बीएमसी कॉलनीत राहणारे दिपक दत्ताराम पवार हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेले होते. एका हॉटेलमध्ये गर्दी असल्याने ते दुसऱ्या हॉटेलच्या दिशेने जात असताना “फिश कोळीवाडा” नावाच्या हॉटेलजवळ त्यांना संशयास्पद प्रकार दिसला. हॉटेलमधील कुक रोटी तयार करताना प्रत्येक रोटीवर थुंकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दिपक पवार यांनी काही वेळ थांबून संपूर्ण प्रकार पाहिला. त्यानंतर संबंधित कुक थुंकलेली रोटी भट्टीत टाकून ग्राहकांना देत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर हा व्हिडीओ परिसरातील नागरिकांना दाखवण्यात आला. काही वेळातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी संबंधित हॉटेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

प्रकरणाची माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हॉटेल मालक फैय्याज अहमद शेख आणि संबंधित कुक कौशार गफार शेख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी अशा प्रकारच्या हॉटेल्सवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईसारख्या शहरात दररोज हजारो लोक हॉटेलमधील अन्नावर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत समोर आलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number