लंडन: मुबंईमध्ये जन्मलेल्या आणि सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात (University of Oxford) कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विरांश भानूशाली (Viraansh Bhanushali) याने आपल्या भाषणाने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवून दिली आहे. 'ऑक्सफर्ड युनियन'मध्ये (Oxford Union) झालेल्या एका वादविवादात त्याने पाकिस्तानच्या मुद्द्यावरून भारताची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली, ज्याचे व्हिडिओ सध्या जगभरात कोट्यवधींच्या संख्येने पाहिले जात आहेत.
ऑक्सफर्ड युनियनमधील या चर्चेचा मुख्य विषय (Motion) 'हे सभागृह असे मानते की पाकिस्तानविषयी भारताचे धोरण हे प्रत्यक्षात सुरक्षा धोरणावर दिलेले लोकानुनयी आहे', ("This House Believes That India's Policy Towards Pakistan Is a Populist Disguise for Security Policy" ) हा होता. याचा अर्थ, भारताचे पाकिस्तानबाबतचे धोरण हे सुरक्षेच्या नावाखाली केलेले निव्वळ लोकप्रियतावादी राजकारण आहे असा होतो. विरांशने या प्रस्तावाच्या विरोधात भाषण केले आणि भारताचे धोरण हे लोकप्रियतेसाठी नसून ते राष्ट्रीय सुरक्षेच्या खऱ्या आणि गंभीर चिंतेवर आधारित आहे, असा खणखणीत युक्तिवाद केला.
विरांशने ऑक्सफर्ड युनियनचे अध्यक्ष मुसा हरराज (Moosa Harraj) यांच्या दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने ठामपणे सांगितले की, भारताने दिलेले प्रत्युत्तर मग ते 26/11 नंतरचा संयम असो किंवा अलीकडच्या काळातील लष्करी कारवाई हे राजकीय फायद्यासाठी नसून धोरणात्मक गणनेचा (Strategic calculation) भाग आहे. भारतावर झालेले मोठे दहशतवादी हल्ले आणि त्याला दिलेली प्रत्युत्तरे यांचा निवडणुकांच्या चक्राशी (Election cycles) कोणताही संबंध नाही, असे त्याने सप्रमाण सिद्ध केले.
भाषणादरम्यान विरांशने एक मुंबईकर म्हणून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा आपल्या शहरावर आणि देशातील हजारो लोकांवर झालेला परिणाम अत्यंत भावूकपणे मांडला. दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश जगाला नैतिकतेचे धडे देऊ शकत नाही, असे सांगत त्याने पठाणकोट, उरी आणि पुलवामा येथील हल्ल्यांचा संदर्भ दिला. "ज्या देशाला स्वतःची लाज वाटत नाही, त्याला तुम्ही अधिक काय लाजवणार?" (“You cannot shame a state that has no shame”) या त्याच्या जळजळीत वाक्याने उपस्थितांची मने जिंकली.
मूळचा मुंबईचा असलेला विरांश हा सध्या इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या 'सेंट पीटर कॉलेज'मध्ये (St Peter’s College) कायद्याचा अभ्यास करत आहे. त्याने आपले शालेय शिक्षण मुंबईतील 'एनईएस इंटरनॅशनल स्कूल'मधून पूर्ण केले. तो 2026 च्या बॅचचा विद्यार्थी असून गेल्या तीन वर्षांत त्याने विविध अतिरिक्त उपक्रमांत भाग घेतला आहे.
विरांशची कामगिरी केवळ भाषणापुरती मर्यादित नसून, तो ऑक्सफर्ड युनियनचा 'चीफ ऑफ स्टाफ' म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे. यापूर्वी त्याने तिथे आंतरराष्ट्रीय अधिकारी (International Officer) आणि सचिव समितीवरही काम केले आहे. याशिवाय, त्याने 'द ऑक्सफर्ड मजलीस' (The Oxford Majlis) या विद्यार्थी उपक्रमाची सह-स्थापना केली असून, याद्वारे सांस्कृतिक आणि बौद्धिक चर्चांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
1823 मध्ये स्थापन झालेली ऑक्सफर्ड युनियन ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि जुनी विद्यार्थी संचलित वादविवाद संस्था मानली जाते. अशा जागतिक व्यासपीठावर भारताची बाजू अत्यंत तर्कसुसंगत आणि प्रखरपणे मांडल्यामुळे विरांश भानूशालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.