अमरावतीमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
अमरावती मध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमचे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाती आले आहेत. मात्र हे अहवाल अतिशय धक्कादायक आहेत तसेच अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशी खळबळजनक माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावतीसह अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या आंदोलनाला गालबोट लागले. तसचे अमरावतीमध्ये भाजपने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे अमरावतीमध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याची माहिती राज्याचे महिला आणि बालकल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच अमरावती शहरात दंगल सुरु झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांमध्ये ४ हजार आक्षेपार्ह ट्विट केले असल्याचेही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आलेल्या अहवालाच्या आधारे सांगितले.