व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ शनिवारी घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत किमान १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रात अचानक निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेनंतर व्हिएतनाम प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित स्पीडबोटमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी असे एकूण ३६ जण प्रवास करत होते. ही बोट होन मे रूट (Hon May Rut) बेटावरून अन थोई (An Thoi) बंदराकडे निघाली होती. मात्र किनाऱ्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर असताना समुद्रात मोठ्या लाटा आणि खराब हवामानामुळे बोटीचे संतुलन बिघडले आणि ती उलटली. या दुर्घटनेनंतर बोटीवरील सर्व प्रवासी समुद्रात फेकले गेले.
व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १३ पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. तर २१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. बचाव करण्यात आलेल्यांमध्ये १७ प्रवासी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Extremely saddened to learn about the tragic news of a boat accident involving Indian nationals near Phu Quoc, Vietnam. My sincere condolences to the families who lost their loved ones. My prayers for the early recovery of the injured survivors. Our Embassy and Consulate are… — Narendra Modi (@narendramodi) July 11, 2026
या दुर्घटनेनंतर भारताच्या व्हिएतनाममधील दूतावासाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली आहे. हनोई येथील भारतीय दूतावास आणि हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून प्रभावित पर्यटकांच्या कुटुंबीयांना आवश्यक माहिती आणि मदत पुरवली जात आहे. भारतीय राजदूतही अधिकाऱ्यांसह फु क्वोक बेटाकडे रवाना झाले असून ते स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारतीय नागरिकांशी संबंधित ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच भारताचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास व्हिएतनाम प्रशासनाच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत पुरवत असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील काही पर्यटक या बोटीत प्रवास करत होते. त्यापैकी काहींचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून इतरांची ओळख आणि स्थिती अधिकृतरीत्या निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मृतांची अंतिम यादी ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाहीर केली जाणार आहे.
व्हिएतनाममधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या फु क्वोक बेटावर दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक भेट देतात. मात्र या भीषण दुर्घटनेमुळे पर्यटन क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात असून या अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास व्हिएतनाम प्रशासनाकडून सुरू आहे.