Vicky-Katrina Reveal Baby Name: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा अनुभवत आहेत. काही दिवसांपूर्वी आई-बाबा झालेल्या या जोडीकडे आता पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे, ते त्यांच्या बाळाच्या नावामुळे. सेलिब्रिटींच्या बाळांची नावं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि यावेळीही तसंच झालं आहे. मात्र, अतरंगी आणि हटके नावांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये विक्की-कतरिनानं निवडलेलं नाव सगळ्यांपेक्षा वेगळं आणि अर्थपूर्ण ठरलं आहे.
विक्की आणि कतरिनाच्या घरी मुलाच्या जन्मानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता होती की, अखेर या चिमुकल्याचं नाव काय असणार? सोशल मीडियावर अंदाज, चर्चा आणि वेगवेगळ्या नावांचे तर्क लावले जात होते. अखेर या दोघांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या मुलाच्या बारशाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या बाळाचा एक हृद्य फोटो पोस्ट करत मुलाचं नाव जाहीर केलं. त्यांच्या पोस्टनुसार, त्यांच्या लेकाचं नाव ‘विहान कौशल’ असं ठेवण्यात आलं आहे. साधं, पारंपरिक आणि सकारात्मक अर्थ असलेलं हे नाव सध्या चर्चेत असलेल्या विचित्र नावांपेक्षा खूपच वेगळं असल्याचं चाहत्यांचं मत आहे.
‘विहान’ या नावाचा अर्थ सकाळ, नवीन सुरुवात किंवा प्रकाश असा होतो. त्यामुळेच हे नाव त्यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या आनंदाचं प्रतीक असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. कतरिनानं आपल्या पोस्टमध्ये भावूक शब्दांत भावना व्यक्त करत, हा क्षण त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलणारा असल्याचं सांगितलं. “आमचा प्रकाशकिरण… आमच्या प्रार्थनांचं उत्तर… एका क्षणात आमचं संपूर्ण विश्व बदलून गेलं,” अशा शब्दांत तिनं मातृत्वाचा आनंद व्यक्त केला आहे.
विक्की आणि कतरिनाचा मुलगा 7 नोव्हेंबर 2025 रोजी जन्माला आला. विशेष म्हणजे, कतरिनानं आपली गर्भधारणा बराच काळ खासगी ठेवली होती. शेवटच्या काही महिन्यांतच त्यांनी चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर आणि नाव जाहीर झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.
सोशल मीडियावर ‘विहान कौशल’ या नावाचं कौतुक होत असून, अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी या नव्या आई-बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ट्रेंडपेक्षा अर्थाला प्राधान्य देणारा हा निर्णय चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
विक्की आणि कतरिनाच्या आयुष्यातील ही नवी सुरुवात त्यांच्या चाहत्यांसाठीही तितकीच खास ठरली असून, ‘विहान’ नावानं बॉलिवूडच्या स्टारकिड्सच्या यादीत एक सुंदर आणि अर्थपूर्ण भर घातली आहे.