मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेले सचिन वाझे यांचा तुरूंगात छळ होत आहे तसेच पोलीस वाझेंना शिवीगाळ करत त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सक्तवसुली संचालनालयाकडून झालेल्या चौकशीदरम्यान केला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने परमबीर सिंग यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान परमबीर सिंग यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. अशातच आज, परमबीर सिंग यांनी नवा स्फोट केला आहे. सचिन वाझे यांनी जबाब मागे घेण्यासाठी पोलीस वाझेंचा छळ करत आहेत तसेच वाझेंना अनेकदा शिवीगाळ करण्यात आली असून त्यांना तुरुंगात विवस्त्र करून मारहाणही केल्याची खळबळजनक माहिती परमबीर सिंग यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिली आहे.
सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी ३ मंत्र्यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या तीन मंत्र्यांचा समावेश असून वाझेसाठी पोलिसांचाही दबाव होता, असा जबाब परमबीर सिंह यांनी आरोपपत्रात नोंदविला आहे.