वाराणसी पोलिस आणि उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन Uttar Pradesh Food Safety and Drug Administration UPFSDA यांनी एक मोठी संयुक्त मोहीम राबवत कोडीनयुक्त खोकल्याच्या सिरपच्या सर्वात मोठ्या रॅकेटपैकी एकाचा भांडाफोड केला आहे. व्यसनासाठी वापरल्या जाणाऱ्या या सिरपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात होता. तीन दिवस चाललेल्या विशेष तपास मोहिमेनंतर FSDA आयुक्त रोशन जेकब यांच्या नेतृत्वाखाली एकूण 31 फर्मवर चौकशी झाली, ज्यापैकी 28 फर्म विरुद्ध वाराणसीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या रॅकेटचे मुख्य सूत्रधार शुभम जयसवाल आणि त्याचे वडील असून, 2023 ते 2025 दरम्यान त्यांनी वाराणसीला केंद्र बनवून तब्बल 89 लाख बॉटल्स कोडीनयुक्त सिरपचे वितरण केले. याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या सिरपच्या गैरवापरामुळे अनेक देशांनी त्याच्या विक्रीवर कडक निर्बंध लावले आहेत.
या नेटवर्कचा शोध घेताना पोलिसांना समजले की हे रॅकेट बांगलादेश आणि गल्फ देशांपर्यंत पसरले आहे. सोनभद्रामध्ये मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर रोजी सोनभद्रा पोलिसांनी वाराणसी शक्तिनगर मार्गावर दोन कंटेनरमधून 1.19 लाख बॉटल्स प्रतिबंधित सिरप जप्त केले. त्यानंतर नोव्हेंबर रोजी गाझियाबाद पोलिसांनी या रॅकेटचा मोठा भाग उद्ध्वस्त करत 1.5 लाख बॉटल्स जप्त केल्या आणि आठ जणांना अटक केली. FSDA च्या झुनैब अली यांनी सांगितले की शुभम जयसवालने 93 फर्मना सिरप पुरवठा दाखवला होता, त्यापैकी 51 फर्म वाराणसीत आहेत. या 51 पैकी 31 फर्मची तपासणी पूर्ण झाली असून, त्यांत 28 फर्म प्रत्यक्ष अस्तित्वात नसल्याचे किंवा बंद असल्याचे आढळले. तरीही त्यांच्या नावाने बोगस बिल, खोटे परवाने आणि बनावट कागदपत्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला जात होता.
तपासात असेही उघड झाले की जयसवाल दोन नावांनी समांतर व्यवसाय करत होता M/s Shaily Traders रांची झारखंड आणि New Vriddhi Pharma वाराणसी. औषध परवाना कायद्याचे हे मोठे उल्लंघन होते. शिवाय बंद असलेल्या नऊ फर्मच्या नावानेही पुरवठा दाखवण्यात आला होता. इतकेच नाही, काही बॉटल्सचा स्टॉक Shri Balaji Medical या फर्मच्या नावाने दाखवण्यात आला होता; मात्र त्याचा मालक स्वतः ज्वेलरी व्यवसायात असल्याचे सांगतो. या रॅकेटमध्ये असिफ आणि वसीम या दोघांची नावेही प्रमुख म्हणून समोर आली आहेत.
शुभम जायसवाल फरार असून तो परदेशात पळाला असण्याची शक्यता तपासली जात आहे. पोलिस त्याच्यावर Lookout Notice जारी करण्याचा विचार करत आहेत. औषध व्यवसायात काही वर्षांपूर्वी प्रवेश केलेल्या शुभम जयसवालच्या संशयास्पद संपत्तीवाढीनेही अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले होते. एवढेच नव्हे, तर राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे त्याने वाराणसीत मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावले होते, ज्यासाठी वाराणसी महानगरपालिकेने 5.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.