वॉशिंग्टन: अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल करत आजपासून H-1B आणि H-4 व्हिसा अर्जदारांची कडक तपासणी आणि मंजूरी प्रक्रिया सुरू केली आहे. या तपासणीमध्ये आता अर्जदारांच्या सोशल मीडिया प्रोफाइल्सचीही तपासणी केली जाणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने (US State Department) जारी केलेल्या नव्या आदेशानुसार 15 डिसेंबरपासून H-1B व्हिसासाठी अर्ज करणारे उमेदवार आणि H-4 व्हिसावर जाणारे त्यांचे अवलंबीत सदस्य यांची ऑनलाइन उपस्थिती तपासली जाणार आहे.
आतापर्यंत ही सोशल मीडिया तपासणी केवळ विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिजिटर (Student and Exchange Visitor) व्हिसासाठीच लागू होती. मात्र आता ट्रम्प प्रशासनाने या नियमांचा विस्तार करत H-1B वर्किंग व्हिसा आणि H-4 अवलंबित व्हिसा अर्जदारांनाही या कक्षेत आणले आहे. यामुळे आयटी व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही या नव्या नियमांचा थेट परिणाम होणार आहे.
नव्या आदेशानुसार H-1B आणि H-4 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या सोशल मीडिया खात्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल करावे लागणार आहेत. जर एखाद्या अर्जदाराने आपले सोशल मीडिया अकाउंट लॉक किंवा खासगी ठेवले असेल, तर व्हिसा मंजुरी प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना अर्जदारांच्या ऑनलाइन हालचालींची संपूर्ण माहिती उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले आहे.
अमेरिकन प्रशासनाच्या मते, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक असून अर्जदारांची पार्श्वभूमी अधिक प्रभावीपणे पडताळून पाहण्यासाठी सोशल मीडिया माहिती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे व्हिसा अर्जदारांनी सोशल मीडिया प्रोफाइल्स सार्वजनिक स्वरूपात ठेवणे अपेक्षित आहे.
या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा परिणाम दिसू लागला असून भारतात अनेक H-1B व्हिसा अर्जदारांचे नियोजित इंटरव्ह्यू पुन्हा ठरवण्यात आले आहेत. सोशल मीडिया तपासणीसंदर्भातील प्रक्रियेमुळे काही अर्जांची छाननी विलंबित झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या F, M आणि J व्हिसा धारकांसाठी हा नियम आधीपासूनच लागू होता. आता ट्रम्प प्रशासनाने तोच नियम आयटी क्षेत्रातील व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत वाढवला असून, यामुळे अमेरिका जाण्याची प्रक्रिया अधिक कडक आणि काटेकोर झाल्याचे स्पष्ट होत आहे.