नवी दिल्ली: अमेरिकेतील H-1B व्हिसा घेण्यासाठी तब्बल 88 लाख 76 हजार 390 भारतीय रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकपणे H-1B व्हिसाचे शुल्क वाढवल्याने भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. कारण, आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणारे हजारो भारतीय अमेरिकेत नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. मात्र, आता इतक्या प्रचंड खर्चामुळे अनेकजण अमेरिकेऐवजी इतर देशांचा विचार करत आहेत. विशेष म्हणजे अशा काही देशांत व्हिसा सहज मिळतो, पगारही चांगला असतो आणि कायमस्वरूपी राहण्याच्या संधीही मिळतात.
कॅनडा: भारतीयांसाठी कॅनडा देश हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. येथे फेडरल स्किल्ड वर्कर प्रोग्राम (FSWP) अंतर्गत आयटी आणि इतर क्षेत्रातील कुशल कामगारांना सहज व्हिसा मिळतो. कॅनडा देशात कायमस्वरूपी राहण्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे.
जर्मनी: युरोपचे आर्थिक केंद्र असलेले जर्मनी उत्पादन, अभियांत्रिकी आणि आयटी क्षेत्रातील कुशल कामगारांना मोठ्या प्रमाणावर संधी देते. येथे जॉब सीकर व्हिसा मिळतो, ज्याच्या मदतीने सहा महिने जर्मनीमध्ये राहून नोकरी शोधता येते. त्यानंतर, जॉब सीकर व्हिसाला वर्क व्हिसामध्ये बदलता येते. सोबतच, EU ब्लू कार्डमुळे नोकरी मिळवणे आणखी सोपे होते.
सिंगापूर: आशियातील मोठे बिझनेस हब असलेले सिंगापूर बॅंकिंग, आयटी आणि मार्केटिंग क्षेत्रासाठी लोकप्रिय आहे. येथे रोजगार पासद्वारे (Employment Pass) व्हिसा दिला जातो. विशेष म्हणजे, याची प्रक्रिया सोपी असून पगारही आकर्षक आहे. यामुळे, अनेक भारतीय व्यावसायिक सिंगापूरकडे वळत आहेत.
युएई: भारतीय व्यावसायिकांसाठी आणखी एक लोकप्रिय ठिकाण म्हणजे संयुक्त अरब अमिराती. येथील व्हिसाची प्रक्रिया सोपी असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युएई देशातील उत्पन्नावर आयकर नाही. आयटी, आरोग्यसेवा आणि बांधकाम क्षेत्रासाठी युएई देशात उत्तम पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत.
ऑस्ट्रेलिया: उच्च जीवनमान आणि सुरक्षिततेसाठी ओळखले जाणारे ऑस्ट्रेलिया देशही नोकरी आणि व्सायवसायासाठी आकर्षक पर्याय ठरते. येथे जनरल स्किल्ड मायग्रेशन (GSM) आणि तात्पुरत्या कौशल्य कमतरता व्हिसाच्या साहाय्याने आयटी, अभियांत्रिकी आणि आरोग्यसेवाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. येथील पगारही भक्कम असल्याने ऑस्ट्रेलिया भारतीयांसाठी आवडते ठिकाण आहे.