वॉशिंग्टन : अमेरिकेने (United States) नायजेरियामधील ISIS (Islamic State) दहशतवादी ठिकाणांवर मोठी लष्करी कारवाई करत उत्तर-पश्चिम नायजेरियामध्ये जोरदार Air Strike केला आहे. या हल्ल्याची अधिकृत माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली असून, या कारवाईचा व्हिडिओही अमेरिकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी Truth Social वर पोस्ट करत सांगितले की, उत्तर-पश्चिम नायजेरियात ISIS कडून सातत्याने होत असलेल्या ख्रिश्चन (Christians) नागरिकांच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. “Commander-in-Chief म्हणून माझ्या आदेशानुसार अमेरिकेने आज रात्री नायजेरियामधील ISIS दहशतवादी गटांवर शक्तिशाली आणि घातक हल्ला केला,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, “हे ISIS चे दहशतवादी गेल्या अनेक वर्षांपासून, अगदी दीर्घकाळापासून निरपराध ख्रिश्चन नागरिकांना लक्ष्य करत होते आणि अत्यंत निर्दयपणे त्यांची हत्या करत होते. मी यापूर्वीही या दहशतवाद्यांना इशारा दिला होता की त्यांनी ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही, तर त्यांना भयंकर परिणाम भोगावे लागतील. आज रात्री तेच घडले.”
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, Department of War (संरक्षण विभाग) ने अत्यंत अचूक आणि नियोजित हल्ले केले. “माझ्या नेतृत्वाखाली असे ऑपरेशन फक्त अमेरिका करू शकते. आम्ही कट्टर इस्लामी दहशतवाद (Radical Islamic Terrorism) वाढू देणार नाही,” असे ठाम मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. याचबरोबर त्यांनी अमेरिकन लष्कराला देवाचे आशीर्वाद लाभो, अशी शुभेच्छा देत ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अमेरिकेच्या Department of War कडून या हवाई हल्ल्यांचे फुटेज प्रसिद्ध करण्यात आले आहे. विभागाने स्पष्ट केले की, ही कारवाई संपूर्ण रात्रभर सुरू होती आणि या ऑपरेशनला “Peace Through Strength” म्हणजेच “शक्तीच्या जोरावर शांतता” असे संबोधण्यात आले आहे.
.@POTUS “Tonight, at my direction as Commander in Chief, the United States launched a powerful and deadly strike against ISIS Terrorist Scum in Northwest Nigeria, who have been targeting and viciously killing, primarily, innocent Christians, at levels not seen for many years, and… pic.twitter.com/ct7rUW128t — Department of War ?? (@DeptofWar) December 26, 2025
नायजेरियामधील ISIS विरोधातील अमेरिकेची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. काही दिवसांपूर्वीच सीरियामधील मध्यवर्ती शहर Palmyra जवळ अमेरिकन आणि सीरियन सैन्याच्या ताफ्यावर संशयित इस्लामिक स्टेट हल्लेखोराने हल्ला केला होता. त्या घटनेनंतर ही कारवाई झाल्याने जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधातील अमेरिकेच्या भूमिकेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.