अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याबाबत अनेक वर्षांपासून विविध चर्चा रंगत आल्या आहेत. मात्र या चर्चांबाबत दोघांनीही कधीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. अशातच आता एका ज्येष्ठ मनोरंजन पत्रकाराने केलेल्या दाव्यामुळे हा जुना विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी दोघांचे केवळ प्रेमसंबंधच नव्हते, तर त्यांचा गुप्त विवाहही झाला होता, असा दावा केला आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियापासून चित्रपटसृष्टीपर्यंत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टमध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या कथित नात्याबाबत अनेक दावे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात दोघांच्या जवळीकीबद्दल माध्यमांमध्ये अनेक चर्चा होत्या. मात्र त्या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध करू नयेत, यासाठी त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव आणला जात असल्याचाही त्यांनी दावा केला.
या चर्चेदरम्यान त्यांनी अभिनेता चिरंजीवी यांच्यासोबत झालेल्या एका संवादाचा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चिरंजीवी यांनी त्यांना विचारले की, "राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या लग्नाबद्दल तुम्ही का लिहिलं नाही?" त्यावेळी त्यांना केवळ दोघांच्या कथित अफेअरबद्दल माहिती होती. मात्र चिरंजीवी यांनी दोघांनी आंध्र प्रदेशातील एका मंदिरात विवाह केल्याचा दावा केला आणि त्या विवाहाशी संबंधित व्यक्तीचा संपर्क क्रमांकही दिला, असे व्यंकटेश यांनी सांगितले. यानंतर त्यांनी या दाव्याची माहिती एका मासिकात प्रसिद्ध केली. बातमी प्रकाशित करण्यापूर्वी त्यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी संपर्क साधल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बातमीबाबत माहिती दिल्यानंतर उर्मिला भावूक झाल्या आणि रडू लागल्या. "तुम्ही मला इतक्या वर्षांपासून ओळखता, मग माझ्याबद्दल अशी बातमी कशी लिहू शकता?" असे त्या म्हणाल्याचा दावा व्यंकटेश यांनी केला.
त्यानंतर त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्याशीही संपर्क साधला. मात्र या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिल्याचे व्यंकटेश यांनी सांगितले. त्यांनी वर्मा यांना या चर्चेचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो, असे सांगितले. मात्र वर्मा यांनी या विषयावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला, असा दावा त्यांनी केला. पॉडकास्टमध्ये पुढे बोलताना उर्मिला यांनी या कथित विवाहाचा स्पष्ट इन्कार केला होता का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितले की, उर्मिला यांनी लग्न झाल्याचे नाकारले नव्हते, मात्र त्या संपूर्ण प्रसंगात त्या भावूक झाल्या होत्या. तसेच दोघांच्या नात्यात दुरावा का आला, याबाबतही त्यांनी स्वतःचे मत मांडले. त्यांच्या दाव्यानुसार, उर्मिला यांना कायदेशीर विवाहाची अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने दोघांचे मार्ग वेगळे झाले.
या कथित विवाहाची माहिती चिरंजीवी यांनी सार्वजनिक का केली, असा प्रश्नही पॉडकास्टमध्ये उपस्थित करण्यात आला. त्यावर व्यंकटेश यांनी सांगितले की, त्या काळात चिरंजीवी आणि राम गोपाल वर्मा यांच्यातील संबंध चांगले होते. नंतर काही कारणांमुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असावेत आणि त्यानंतरच ही माहिती बाहेर आली असावी, असा त्यांचा अंदाज आहे.