UPI Records: भारताची डिजिटल पेमेंट व्यवस्था सध्या चित्त्याच्या वेगाने प्रगती करत आहे. 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मार्च 2026 मध्ये UPI व्यवहारांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या महिन्यात एकूण व्यवहारांचे मूल्य 29.53 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर व्यवहारांची संख्या 22.64 अब्ज इतकी नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत व्यवहारांच्या मूल्यात 19 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हे मूल्य 26.84 लाख कोटी होते, त्या तुलनेत मार्चमध्ये सुमारे 10 टक्के वाढ दिसून आली आहे. या वाढीमागे सणासुदीचा काळ आणि आर्थिक वर्षाच्या समाप्तीनिमित्त झालेले व्यवहार ही मुख्य कारणे आहेत.
दैनंदिन व्यवहारांची सरासरी वाढली
मार्च 2026 मधील हा विक्रम विशेष महत्त्वाचा आहे कारण या महिन्यात UPI नेटवर्कने दररोज सरासरी 730 दशलक्ष (73 कोटी) व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ही सरासरी 728 दशलक्ष (72.8 कोटी) इतकी होती. मार्च महिन्यात होळी आणि ईद यांसारखे प्रमुख सण आल्यामुळे आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली. NPCI च्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्चमध्ये व्यवहारांचे मूल्य 24.77 लाख कोटी होते, जे आता 29.53 लाख कोटींवर पोहोचले आहे. ही आकडेवारी डिजिटल अर्थव्यवस्थेत UPI चे वर्चस्व अधोरेखित करते.
लहान शहरे आणि मर्चंट पेमेंट्सचा वाटा
UPI ची ही क्रांती आता केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लहान शहरांमधील दुकानदार आणि ग्राहक वेगाने डिजिटल पेमेंटकडे वळत आहेत. 'PayNearby' चे संस्थापक आनंद कुमार बजाज यांच्या मते, अगदी साध्या पानाचे दुकान चालवणाऱ्यांपासून ते भाजी विक्रेत्यांपर्यंत सर्वजण आता सहजपणे UPI स्वीकारत आहेत. विशेष म्हणजे, एकूण व्यवहारांच्या संख्येत 'मर्चंट पेमेंट्स'चा (व्यापाऱ्यांना केलेले व्यवहार) वाटा 62 टक्के झाला आहे. यापैकी 86 टक्के व्यवहार हे 500 रुपयांपेक्षा कमी रकमेचे आहेत, तर 10 टक्के व्यवहार 500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान आहेत.
हेही वाचा – SIM Binding Rule: WhatsApp आणि Telegram वापरकर्त्यांना दिलासा; SIM Binding बाबत सरकारचा मोठा निर्णय
जागतिक स्तरावर UPI चा डंका
भारतात होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांमध्ये एकट्या UPI चा वाटा 85 टक्के इतका आहे. जागतिक स्तरावरही निम्म्याहून अधिक 'रिअल-टाइम' डिजिटल व्यवहार UPI द्वारेच पूर्ण केले जातात. सध्या UPI ची सेवा UAE, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस या 7 देशांमध्ये सुरू आहे. फ्रान्समधील लाँचमुळे युरोपियन बाजारपेठेत भारताने मोठे पाऊल टाकले आहे. NPCI, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही प्रणाली आता अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनली असून, सामान्य भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे.