नवी दिल्ली : सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांचे खंडपीठ एका वकिलाला ‘वरिष्ठ वकील’ पद मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याबद्दल फटकारत असताना एक धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. खंडपीठाने म्हटले की, समाजात आधीच व्यवस्थेवर हल्ला करणारे ‘परजीवी’ आहेत. त्यांनी याचिकाकर्त्याला विचारले की, त्याला त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का. संपूर्ण जग वरिष्ठ (वकील) होण्यास पात्र असेल, पण किमान तुम्ही तरी त्यासाठी पात्र नाही, असे खंडपीठाने याचिकाकर्त्या वकिलाला सांगितले. स्पष्टपणे व्यथित झालेल्या सरन्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, जर दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला वरिष्ठ वकील पद बहाल केले. तर सर्वोच्च न्यायालय त्याचे व्यावसायिक वर्तन पाहून ते रद्द करेल. तसेट सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याने फेसबुकवर वापरलेल्या भाषेचाही उल्लेख केला.
यावेळी सनन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले की, “समाजात आधीच असे परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात आणि तुम्ही त्यांच्याशी हातमिळवणी करू इच्छिता? झुरळांसारखे तरुण आहेत, ज्यांना कोणतीही नोकरी मिळत नाही किंवा व्यवसायात कोणतेही स्थान नाही. त्यापैकी काही माध्यमकर्मी बनतात, काही सोशल मीडिया, आरटीआय कार्यकर्ते आणि इतर कार्यकर्ते बनतात. ते सर्वांवर हल्ला करू लागतात,” असे ते म्हणाले. खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की, त्यांची दुसरी कोणती कायदेशीर लढाई नाही का. “वरिष्ठ वकील म्हणून पद मिळवू पाहणाऱ्या व्यक्तीचे हे वर्तन आहे का?” असा प्रश्न खंडपीठाने विचारला.
वरिष्ठ वकील हे पद एखाद्या व्यक्तीला प्रदान केले जाते, त्याचा पाठपुरावा करायचा नसतो, असे खंडपीठाने म्हटले. “तुम्ही त्याचा पाठपुरावा करत आहात. हे योग्य वाटते का?” असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने विचारले. तसेच, वरिष्ठ वकील हे पद केवळ शोभेसाठी ठेवण्याचे प्रतिष्ठेचे प्रतीक आहे का. तसेच, खंडपीठाने असेही नमूद केले की, काळ्या वेशात असलेल्या अनेकांच्या पदव्यांच्या सत्यतेबद्दल गंभीर शंका असल्याने, केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (CBI) त्या पदव्यांची पडताळणी करण्यास सांगावे. खंडपीठाने म्हटले की, बार कौन्सिल ऑफ इंडिया या विषयावर कधीही काहीही करणार नाही. कारण त्यांना “त्यांची मते हवी आहेत”. याचिकाकर्त्याने खंडपीठाची माफी मागितली असून याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. खंडपीठाने याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.