नवी दिल्ली: हॉटेलमध्ये चेक-इन करताना तुम्ही सहजपणे आधार कार्डची फोटोकॉपी रिसेप्शनवर देत असाल, तर आता ही सवय त्वरित बदला. कारण सरकार आणि Unique Identification Authority of India (UIDAI) आधार सुरक्षेसाठी नवे आणि कडक नियम आणत आहेत. या नियमामुळे हॉटेल्स, इव्हेंट आयोजक आणि अशा ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्थांना आधार कार्डची फोटोकॉपी घेणे थांबवावे लागणार आहे. या नव्या उपक्रमाचा हेतू नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि तिच्या दुरुपयोगाला आळा घालणे हा आहे.
कागदावर आधारित पडताळणीऐवजी आता QR कोड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ओळख पडताळणी केली जाईल. PTI च्या अहवालानुसार UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी सांगितले की, या नियमाला मंजुरी मिळाली असून लवकरच तो अधिसूचित केला जाईल. ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक केली जाणार आहे. UIDAI प्रमुखांनी स्पष्ट केले की हॉटेल्स आणि इव्हेंट आयोजकांकडून आधार कार्डची फोटोकॉपी घेण्याची ही पद्धत Aadhaar Act विरुद्ध आहे. आता आधार-आधारित पडताळणी करू इच्छिणाऱ्या प्रत्येक संस्थेला UIDAI कडे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.
या प्रक्रियेने वापरकर्त्यांची प्रायव्हसी अधिक सुरक्षित राहील आणि कोणत्याही प्रकारची कागदोपत्री माहिती लीक किंवा गैरवापर होण्याचा धोका कमी होईल. नवा नियम लागू झाल्यानंतर पडताळणीसाठी QR कोड स्कॅन करण्याची सुविधा उपलब्ध होईल किंवा नव्याने लॉन्च केलेल्या आधार अॅपचा वापर करून त्वरित Identity Verification करता येईल.
यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि कागदविरहित बनेल. वापरकर्त्याच्या माहितीवर त्याचाच नियंत्रण राहील, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसोबतच UIDAI च्या आधार अॅपमधील काही महत्त्वाचे आणि शक्तिशाली फीचर्स वापरकर्त्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे. या अॅपमध्ये Biometric Lock सुविधा आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचा बायोमेट्रिक डेटा लॉक करून ठेवू शकता.
Selective Data Sharing फीचरमुळे तुम्हाला फक्त हवा तोच डेटा उदा. नाव किंवा फोटो शेअर करण्याची मुभा मिळते. अॅपमधील QR Code Verification फिचरमुळे बँक किंवा हॉटेलमध्ये लगेचच पेपरलेस पडताळणी करता येते. तसेच Usage History च्या माध्यमातून तुमचा आधार कधी आणि कुठे वापरण्यात आला हे तपशीलवार पाहता येते. Multi-profile Management मुळे एका अॅपमध्ये कुटुंबातील अनेक सदस्यांचे प्रोफाइल सहज हाताळता येतात. नव्या नियमांमुळे नागरिकांचा डेटा अधिक सुरक्षित होणार असून, आधारवर आधारित व्यवहार अधिक आधुनिक, सुरक्षित आणि पारदर्शक बनतील. डिजिटल ओळख पडताळणीच्या दिशेने भारताने घेतलेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
हेही वाचा: Japan Earthquake Update : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीच्या लहान लाटाही