मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी भक्तांचे श्रद्धासबुरी साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही, असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींच्या साईबाबांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याचा साईभक्तांकडून निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, उद्धव गटाने धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात उद्धव गटाने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेलं वादग्रस्त वक्तव्य समोर आल्यानंतर बागेश्वर बाबांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचंही युवासेनेनं तक्रारीत म्हटलं आहे.
शिर्डीच्या साईबाबा यांच्याबाबत धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली जात आहे. तर शिर्डीतील ग्रामस्थ आणि साईभक्तांनी शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच त्यांनी माफी मागावी अशी मागणी साईभक्तांकडून करण्यात आली आहे. तर, साईबाबा हे आमचे दैवत आहेत, अशी प्रतिक्रिया साईभक्तांनी दिली आहे.
जबलपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री म्हणाले, शंकराचार्य यीं साईबाबा यांना देवाचे स्थान दिले नाही. आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामळे साई हे देव नाहीत हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री म्हणाले.