वॉशिंग्टन डीसीमध्ये नॅशनल गार्डच्या दोन सैनिकांवर गोळीबार झाल्यानंतर, ट्रम्प प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला अमेरिकेत आलेल्या 19 'उच्च जोखीम' वर्गात असलेल्या देशांतील नागरिकांना जारी केलेल्या सर्व ग्रीन कार्ड्सची पुन्हा काटेकोर आणि कठोरपणे तपासणी केली जाणार असल्याची घोषणा केली. याबाबत युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसचे संचालक जोसेफ ॲडलो यांनी या निर्णयाची माहिती दिली.
त्यानंतर आता ट्रम्प प्रशासन 19 वरून थेट 30 देशांपर्यंत हे कडक नियम लागू करणार आहेत. यामागच कारण असं की, वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या दोन नॅशनल गार्ड सदस्यांवरील गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता आणि दुसरा गंभीर जखमी झाला होता. तर या घटनेशी संबंधित असणारा संशयित रहमानउल्लाह लकनवाल हा अफगाण नागरिक 2021 मध्ये अमेरिकेत आला होता. एवढचं नव्हे तर त्याने अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्य आणि सीआयएसोबत काम केल्याचा आरोप देखील त्याच्यावर केला जात आहे.
त्यामुळे ट्रम्प प्रशासन एकूण 12 देशांवर पूर्ण बंदी घातली असून यात अफगाणिस्तान, चाड, कांगो, इरिट्रिया, इराण, लिबिया, म्यानमार, सोमालिया, सुदान, येमेन, इक्वेटोरियल गिनी आणि हैती यांचा समावेश आहे. तर बुरुंडी, क्यूबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांवर आंशिक बंदी म्हणजेच या देशांवर पूर्णपणे नाही तर काही ठरावीक अटी लागू करुन बंदी घातली जाईल. त्याचसोबत यूएससीआयएस ने जाहीर केले आहे की पूर्वी बंदी घातलेल्या १९ देशांमधील नागरिकांसाठी ग्रीन कार्ड, व्हिसा आणि इतर इमिग्रेशन अर्ज सध्या थांबवले जात आहेत आणि माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रशासनाच्या काळात आलेल्या आणि या काळात प्रवेश मिळालेल्यांचीही पुन्हा तपासणी केली जाईल.