संरक्षण मंत्रालयाने पुणे विमानतळ प्राधिकरणाला दोन एकर जागा वार्षिक एक रुपयाच्या भाडेतत्त्वावर देण्यास मंजूरी दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी ही जागा एका वर्षासाठी १ कोटी ३० लाख रुपये भाड्याने देण्याचे मान्य केले होते. मात्र, आता ही जागा अवघ्या एक रुपयात भाडे तत्त्वावर देण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. तसेच पाच वर्षांच्या करारावर विमानतळ प्राधिकरण ही जागा घेत आहे.
पुणे विमानतळावर प्रवासी व कार्गो सेवेला चांगला प्रतिसाद लागतो. मात्र, आवश्यक ती जागा उपलब्ध होत नसल्याने या सेवेचा विस्तार होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या एक एकर जागेवर कार्गोची सेवा चालते मात्र ही जागा विमानतळावरील एक व दोन क्रमांकाच्या टर्मिनलमध्ये येत असल्याने दोन्ही टर्मिनल एकमेकांना जोडण्यात अडचणी येत होत्या. परंतु संरक्षण मंत्रालयाची २.५ एकर जागा उपलब्ध होत असल्याने कार्गो सेवा या दोन एकरमधून सुरू होणार असल्यामुळे टर्मिनल १ आणि टर्मिनल २ एकमेकांना जोडले जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.