वॉशिंग्टन: जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अकल्पनीय आणि खळबळजनक निर्णयांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी शांततेचे आवाहन करणारे ट्रम्प, दुसरीकडे चक्क एका सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षाला अटक करून अमेरिकेत खेचून आणतात, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे! व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या जागतिक वादाच्या केंद्रस्थानी आता भारतही आला असून, ट्रम्प यांनी भारताला दिलेला इशारा दिल्लीच्या सत्तावर्तुळात चिंतेचा विषय ठरत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ही 'तेल नीती' जगासाठी चिंतेची बाब ठरत असतानाच, त्यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून थेट लक्ष्य केले आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करत असल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर तब्बल 50 टक्के टॅरिफ (सीमा शुल्क) लादला आहे.
इतकेच नाही, तर ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात बजावले आहे की, जर भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केले नाही, तर हा टॅरिफ अधिक वाढवला जाईल. ट्रम्प यांच्या या 'ब्लॅकमेलिंग' धोरणामुळे भारताची अमेरिकेतील निर्यात घटली असून व्यापारी संबंधांना तडे गेले आहेत.
या टॅरिफ युद्धाचा अमेरिकेला मोठा आर्थिक फायदा झाला असून, खुद्द ट्रम्प यांनीच सोशल मीडियावर याची आकडेवारी जाहीर केली आहे. "आम्ही टॅरिफच्या माध्यमातून 600 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पैसा कमावला असून ही कमाई लवकरच नवी उंची गाठेल," अशी पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे. 'फेक न्यूज' पसरवणाऱ्यांना चपराक देत त्यांनी अमेरिकेच्या तिजोरीत पडलेल्या या अफाट रकमेचे श्रेय आपल्या आक्रमक धोरणांना दिले आहे. मात्र, अमेरिकेचा हा नफा भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांना परवडणारा नाही.
अमेरिकेची नजर आता भारतीय बाजारपेठेवर आहे, पण भारतही नमते घेण्याच्या भूमिकेत नाही. भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या आणि स्थानिक उद्योगांच्या हिताचा बळी देऊन कोणताही व्यापार करार केला जाणार नाही. कोणताही नवीन करार करण्यापूर्वी सध्याचा जाचक टॅरिफ 15 टक्क्यांपर्यंत खाली आणावा, ही भारताची प्रमुख मागणी आहे. मात्र, ट्रम्प यांच्या ताज्या विधानांनी व्यापार चर्चेत मोठे अडथळे निर्माण केले आहेत.
व्हेनेझुएलावरील लष्करी कारवाईत 40 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्याने ट्रम्प यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. दुसरीकडे, भारतासारख्या मित्र देशालाही निर्बंधांची धमकी दिल्याने अमेरिकेच्या जागतिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ट्रम्प यांना कोणत्याही परिस्थितीत जगाची सत्ता स्वतःच्या मुठीत हवी असल्याचे त्यांच्या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या टॅरिफ युद्धाला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात आणि भारतीय बाजारपेठेचे रक्षण कसे करतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.