वॉशिंग्टन: जागतिक राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था काहीशी 'इकडे आड, तिकडे विहीर' अशीच झाली आहे. इराणसोबतच्या युद्धात जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या ट्रम्प यांना आता थेट त्यांच्या घरातून, म्हणजेच पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्याकडूनच एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. जागतिक शांततेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत कळीच्या ठरणाऱ्या युद्धबंदीच्या वाटाघाटी सुरू असतानाच, मेलानिया यांनी थेट 'एपस्टाईन फाईल्स'चे प्रकरण पुन्हा बाहेर काढल्याने अमेरिकन राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने जागतिक भूराजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. या युद्धात अमेरिकेच्या मदतीला एकही मित्रराष्ट्र पुढे न आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी नामुष्की सहन करावी लागली आहे. अखेर, ही कोंडी फोडण्यासाठी आणि युद्धबंदी करारासाठी त्यांना चक्क पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून पुढे करावे लागले.
होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद असल्याने अमेरिकेसह संपूर्ण जगावर तेलाच्या टंचाईचा आणि महागाईचा प्रचंड दबाव आहे. ही कोंडी फुटल्यास आणि खाडी वाहतुकीसाठी पुन्हा खुली झाल्यास जागतिक बाजारात तेलाच्या किमती स्थिर होतील, असा दावा ट्रम्प प्रशासनाकडून केला जात असला, तरी सध्याच्या घडीला ट्रम्प हे आंतरराष्ट्रीय मंचावर पूर्णपणे एकाकी पडल्याचे विदारक चित्र आहे.
केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर देशांतर्गत आघाडीवरही ट्रम्प यांच्यासमोरील अडचणींचा डोंगर वाढत आहे. अमेरिकन जनतेला हे युद्ध नको आहे. इराणसोबतच्या या प्रदीर्घ संघर्षामुळे अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला असून, जनक्षोभ तीव्र होत चालला आहे. याशिवाय, 'कोणतेही कारण नसताना अमेरिकेने आमच्यावर युद्धाचे आणि महागाईचे भयंकर परिणाम लादले', अशी संतप्त भावना अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. जगाला आर्थिक संकटाच्या खाईत लोटल्याचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवला जात असून, त्यांच्या या धोरणांवरून जगभरातून तीव्र रोष व्यक्त होत आहे.
एकीकडे जागतिक दबावामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थीने युद्धबंदीसाठी बैठकांचे सत्र सुरू असतानाच, 9 एप्रिल 2026 रोजी मेलानिया ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. मेलानिया यांनी कुख्यात आणि आता मृत असलेल्या जेफ्री एपस्टाईन याच्याशी संबंधित फाईल्सचा मुद्दा अचानक पुन्हा उकरून काढला आहे. लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या एपस्टाईनबाबत आपल्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या सर्व खोट्या अफवा आणि अहवाल मेलानिया यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. त्यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न त्वरित थांबला पाहिजे, असे सुनावत असतानाच त्यांनी या प्रकरणातील 'पीडितांच्या न्यायालयीन सुनावणीची' थेट मागणी करून एकच राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
मेलानिया ट्रम्प यांची ही मागणी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी एक राजकीय 'टाईम बॉम्ब' ठरू शकते. कारण, एपस्टाईन प्रकरणात सातत्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाभोवती संशयाचे धुके निर्माण केले जाते. आता प्रत्यक्ष 'फर्स्ट लेडी'नेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी सुनावणीची आग्रही मागणी केल्याने ट्रम्प यांच्या देशांतर्गत कायदेशीर आणि राजकीय अडचणीत मोठी भर पडण्याची दाट शक्यता आहे. परदेशातील युद्ध आघाडीवर झालेली मानहानी आणि घरातूनच उकरून काढले गेलेले अत्यंत वादग्रस्त प्रकरण, यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना आता या दुहेरी संकटाचा सामना कसा करावा लागतो, हे पाहणे निर्णायक ठरणार आहे.
हेही वाचा: Income Tax Rules: शेतजमीन विकताय? मग ‘हा’ नियम नक्की वाचा; नाहीतर भरावा लागेल मोठा कर