Triple Talaq On WhatsApp: भारतात तिहेरी तलाक हा कायदेशीर गुन्हा आहे, परंतु असे असूनही अशी अनेक प्रकरणे उघडकीस येतात. केरळमधील कासारगोडमध्ये तिहेरी तलाकचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीने दुबईहून व्हॉट्सअॅपवर तिला तिहेरी तलाक दिला आणि सर्व संबंध तोडले. पीडित महिलेच्या पतीने तिला व्हॉट्सअॅपवर 'तलाक-तलाक-तलाक' असा संदेश पाठवला. हा मेसेज महिलेच्या वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर आला. पती अब्दुल रझाक यांच्या संदेशात 'तलाक' हा शब्द तीन वेळा वापरण्यात आला होता. याचा अर्थ असा की, आता त्याचे पीडित महिलेशी काहीही संबंध नसून त्यांच्यातील लग्न संपले.
पीडितेच्या कुटुंबाने दाखल केला गुन्हा –
केंद्र सरकारने देशात तिहेरी तलाक रोखण्यासाठी कायदा आणला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर कासारगोडमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच खटला आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 21 वर्षीय मुलीचा पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंडा न दिल्याबद्दल तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. आता त्याने व्हॉट्सअॅपवर तीनदा तलाक म्हटले आणि नंतर दुबईहून तिला फोन करून घटस्फोटाची ऑफर दिली. आता पीडितेच्या कुटुंबियांनी याप्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पतीकडून पैशांची मागणी –
रिपोर्ट्सनुसार, अब्दुल रझाक युएईमध्ये राहतो आणि त्याने 21 फेब्रुवारी रोजी हा संदेश पाठवला होता. तिहेरी तलाक हा इस्लाममध्ये घटस्फोटाचा एक प्रकार आहे जो मुस्लिम पुरुषाला आपल्या पत्नीला तीन वेळा "तलाक" म्हणून घटस्फोट देण्याची परवानगी देतो. कासारगोड येथील रहिवासी रज्जाकने ऑगस्ट 2022 मध्ये एका महिलेशी लग्न केले. त्यावेळी ती महिला 18 वर्षांची होती. महिलेने आरोप केला आहे की, रज्जाक तिच्याकडून पैसे मागायचा आणि तो तिला एकदा युएईला घेऊन गेला होता.
पैसे मिळताच घटस्फोट –
पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितले की, पैसे मिळाल्यानंतर, रज्जाकने तिहेरी तलाकचा संदेश पाठवला. तलाकसाठी एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वडीलधारी आणि धार्मिक लोकांची भूमिका असते. हा तलाक देण्याचा मार्ग नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. जावयाला पैसे देण्यासाठी त्यांनी मुलीचे दागिने विकले होते.
हेही वाचा – ब्रेक न घेता डबल ड्युटीवर असताना डुलकी लागणे, हा गुन्हा नाही! कर्नाटक उच्च न्यायालयचे निरीक्षण
तिहेरी तलाक म्हणजे काय?
तिहेरी तलाक हा एक इस्लामी शब्द आहे ज्याचा अर्थ विवाह तुटणे असा होतो. एक मुस्लिम पुरूष तीन वेळा तलाक देऊन आपल्या पत्नीशी असलेले वैवाहिक संबंध तोडतो. भारतात तिहेरी तलाक बेकायदेशीर आहे. या संदर्भात कायदेही करण्यात आले आहेत.