वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या दिल्लीत झालेल्या हत्या प्रकरणाचा पोलिसांचा तपास पुर्ण झाला आहे. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच १०० पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. आरोपपत्रात कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून ते कायदेतज्ज्ञांचा टीमकडे पाठवण्यात आले आहे. पुढच्या दोन दिवसांत आरोपपत्र न्यायालात दाखल होणार आहे. १८ मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याने हत्या केली होती. आफताबने हत्येची कबुलीही दिली आहे.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा हत्याकांडाचे गांभीर्य लक्षात घेत आरोपपत्र मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये घटनेशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. जंगलातून सापडलेल्या हाडांच्या डीएनए अहवालाबरोबरच पोलिसांनी आरोपी आफताबच्या नार्को आणि पॉलीग्राफ चाचणी आणि इतर फॉरेन्सिक चाचण्यांचा अहवालही आरोपपत्रात जोडले आहे.
श्रद्धा वालकरच्या २३ हाडांचे पोस्टमार्टन विश्लेषण करण्यात आले. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. डीएनए टेस्टमध्ये ही हाडे श्रद्धाची असल्याचा अहवाल आला होता. डीएनए अहवालासाठी श्रद्धाच्या वडिलांचे सॅम्पल वापरण्यात आले होते. ती हाडे श्रद्धाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एम्समध्ये त्याचे विश्लेषण केले गेले. या विश्लेषणात करवतीने हाडे कापल्याचे स्पष्ट झाले. करवतीचे निशानही त्यावर सापडले आहे.