लग्न म्हटले की, वाहनांची भलीमोठी रांग. कर्कश आवाजात वाजणारा डीजे आणि दारुच्या नशेत डोलणारी तरूणाई हेच चित्र डोळ्यासमोर येते. मात्र या दिखाव्याचे ढोंग बाजूला सारत देवरी तालुक्यातील कडीकसा येथील देवराज कुंभरे या तरूणाने आपल्या लग्नात वाहन, ना कर्कश आवाजात वाजणारे डीजे न ठेवता तब्बल २५ बैलगाड्यांतून १० किलोमीटर वरात काढली.
सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीमुळे प्रत्येक वर्ग त्रासला आहे. आजच्या घडीला आधूनिकता आणि फॅशन च्या शर्यतीत प्रत्येकांना लग्न सोहळा करणे तारेवरची कसरत वाटत आहे. अशा परिस्थितीत ही आदिवासी समाजातील तरुण पीढ़ी आदिवासी रितीभातींच्या पलीकडे जाऊन लग्नासारखे विधी करताना दिसत आहेत. असाच एक लग्न सोहळा देवरी तालुक्यातील कडीकसा(गणुटोला) येथील आदिवासी तड़फदार तरुण देवराज भागीराम कुंभरे यांचा लग्नसोहळा याच तालुक्यातील वांढरा येथील मनीराम कुंजाम यांची मुलगी टिकाबाली हिच्याशी पार पडला. या लग्न सोहळ्यात जाणारी वरात ही कार-बस ने नाही तर तब्बल २५ बैलगाड्यांवरून वरात काढण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. नवरा नवरीच्या बैलगाड़ी पासून ते वराती ज्या बैलगाड़ीमध्ये बसणार आहेत त्यालाही आकर्षक देखावा करण्यात आला होता .
आदिवासी रीतीभाती आणि संस्कृती प्रमाणे लग्नाच्या वरातीत फक्त आदिवासी लोकगीत सादर करण्यात आले.तसेच लोप पावत चाललेली कला या लग्नात सादर करण्यात वर्हाडीही आदिवासी नृत्यावर थिरकले आणि लग्न सोहळाच्या आनंद घेतला. हा विवाह सोहळा आदर्श ठरला असून आपली लोकपरंपरा जीवंत ठेवण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे देवराज कुंभरे या तरूणाने सांगितले.
अशा प्रकारे बैलगाड़ीवर निघनारी लग्नाची वरातींची मिरवणूक तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच पाहण्यास मिळाली असून या उपक्रमामुळे तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात देवराज यूथ आइकॉन ठरला आहे.या लग्नाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.