नोव्हेंबर महिना संपल्याबरोबर नवीन सरत्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक नवीन बदल होणार आहेत. हे बदल 1 डिसेंबरपासून लागू होणार असून परिवहन विभागाने देखील उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी पाचवी मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 एप्रिल, 30 जून, 15 ऑगस्ट, 30 नोव्हेंबर रोजी यासाठीची मुदतवाढ देण्यात आली होती. 31 डिसेंबरपर्यंत परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ दिली आहे.
पुण्यात परिवहन विभागाकडून अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरी देखील पुण्यात अद्यापही 65 टक्के वाहनांना नंबरप्लेट बसविलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी महिन्यापासून ही नंबरप्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. अपघात किंवा गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या वाहनांची ओळख सहजरित्या होऊन त्यांना अटक करता यावे म्हणून सर्व वाहनांना सुरक्षा नंबरप्लेटचे बंधन घालण्यात येत आहे.
तर ज्या वाहनांवर सुरक्षा नंबरप्लेट बसवलेल्या नाही आहेत अशा वाहनांची आरटीओतील (प्रादेशिक परिवहन कार्यालय) कामे स्थगित ठेवण्यात आली आहे. दरम्यान 31 डिसेंबरपर्यंत सुरक्षा नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात येईल, त्यामुळे ज्या वाहनांनी अद्याप सुरक्षा नंबरप्लेट बसवले नसतील तर त्यांनी त्वरित या नंबरप्लेट बसवणे बंधनकारक असणार आहे. असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. तर आतापर्यंत पुण्यातील साडेसात सात लाख वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेट बसवून घेतली आहे, तर पावणेदहा लाखांच्या आसपास वाहनधारकांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी केली.
राज्यात एक एप्रिल 2019 पूर्वी जुन्या वाहनांची संख्या अंदाजे 2.10 कोटी इतकी असून त्यात 90 लाख वाहनांची एचएसआरपीसाठी नोंदणी झाली आहे. त्यात 73 लाख वाहनांना एचएसआरपी बसवण्यात आले आहे. नंबरप्लेट अतिशय खराब दर्ज्याचा असल्यामुळे राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी एचएसआरपीला मुदतवाढ देण्याची मागणी सरकारकडे केली होती.