वारकऱ्यांवरील लाठीमाराचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि अशी प्रतिक्रिया उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निषेध व्यक्त केला आहे.
‘ पंढरपूरच्या वारीच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. योग्य प्रकारच्या नियोजनात असे प्रकार घडत नाहीत. घडलेला प्रकार अत्यंत क्लेशदायक आहे.
वारकऱ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो.’, असे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले आहेत.
‘वारकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा निषेध असो !’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ‘जे आजवर कधीही घडले नाही ते यावर्षी घडले. वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यापुर्वी कधीही वारकऱ्यांवर बळाचा वापर केल्याची घटना घडली नव्हती. आपल्या साध्या आणि सोप्या शिकवणूकीतून वारकऱ्यांनी देशाला वेळोवेळी दिशा दाखविली आहे. माऊलींच्या दिंडीसोहळ्याला प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे गालबोट लागले. दिंडीसोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी, दोषी व्यक्तींची चौकशी करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.’, असे ट्विट राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
‘वारक-यांवर लाठीहल्ल्याची घटना अत्यंत संतापजनक, उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा’, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ‘दंगेखोरांना मोकाट सोडून वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणा-या शिंदे फडणवीसांचा धिक्कार असो’, या शब्दात नाना पटोले यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
‘आषाढी वारी निमित्त आळंदी मध्ये एकवटलेल्या वारकरी सांप्रदायावर अशा पद्धतीने अमानुष लाठी हल्ला करणे निव्वळ निंदनीय आहे.’ ‘देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पोलिसांना योग्य त्या सूचना द्याव्यात जेणेकरून आजपासून सुरू होणाऱ्या वारीमध्ये पुन्हा असा दुर्दैवी प्रसंग येऊ नये.’, अशी प्रतिक्रिया उद्धव गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
आळंदीत वारकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. मंदिर प्रशासनाची शिस्त मोडणाऱ्या वारकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला. आळंदीत वारकऱ्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. वारकऱ्यांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी हस्तक्षेप करत वारकऱ्यांवर लाठीमार केला आहे. या प्रकरणी, ‘वारकऱ्यांवर लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट झाली’, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.