राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून राज्यात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट आली असून शुक्रवारी विदर्भात सर्वाधिक ४२. ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये तीव्र उष्णतेच्या झळा झळकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर दैनंदिन तापमानाच्या तुलनेत तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तर पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.