वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेले शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर शेतकरी संघटनांकडून गुरूवारी शेतकरी आंदोलन संपवण्याची घोषणा करण्यात आली.
यापूर्वी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कृषी सचिवांच्या स्वाक्षरीने शासनाकडून पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने बैठक घेऊन आंदोलन मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.
शेतकरी गेल्या ३७८ दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत होते. आणि आज केंद्र सरकारच्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर राजधानीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
गृहमंत्रालयाने मंगळवारी शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. आंदोलनदरम्यान शेतकऱ्यांवर दाखल केलेले खटले कायमस्वरुपी मागे घेतले जाणार असून मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास सरकार तयार आहेत. पंजाब सरकारने शेतकऱ्यांन भरपाई देण्याची घोषणा केली असून आता केंद्र सरकारसह हरयाणा, उत्तर प्रदेश सरकारही शेतकऱ्यांना भरपाई देण्यास तयार आहेत.