Stock Market Crash: ट्रम्प यांच्या ‘त्या’ एका विधानाने दलाल स्ट्रीट हादरला; सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी कोसळला, 4 लाख कोटी पाण्यात

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर बाजारात चौफेर विक्रीचा मारा सुरू झाला, ज्यामुळे सेन्सेक्स 1,600 पेक्षा जास्त अंकांनी गडगडला तर एनएसईचा निफ्टी थेट 24,000 च्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली आला.

Stock Market Crash: ट्रम्प यांच्या ‘त्या’ एका विधानाने दलाल स्ट्रीट हादरला; सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी कोसळला, 4 लाख कोटी पाण्यात

Stock Market Crash: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी दुपारच्या सत्रात प्रचंड घबराट पसरली. कच्च्या तेलाचे भडकलेले दर आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे आधीच दबावात असलेल्या बाजारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने मोठी पडझड घडवून आणली. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर बाजारात चौफेर विक्रीचा मारा सुरू झाला, ज्यामुळे सेन्सेक्स 1,600 पेक्षा जास्त अंकांनी गडगडला तर एनएसईचा निफ्टी थेट 24,000 च्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली आला. या काही तासांच्या हाहाकारात गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी रुपये एका फटक्यात स्वाहा झाले.

इराणबाबत ट्रम्प यांची कठोर भूमिका; भू-राजकीय तणावामुळे तेल पुरवठा धोक्यात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा तात्पुरता शांतता करार पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केल्याने बाजारातील विक्रीला प्रचंड वेग आला. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधील व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांड'ने इराणवर हवाई हल्ले केले असून, इराणी कच्च्या तेलाच्या विक्रीवर पुन्हा कडक निर्बंध लादले आहेत. मध्यपूर्वेतील या ताज्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली असून, या भू-राजकीय तणावाचे थेट सावट भारतीय शेअर बाजारावर उमटले.

सेन्सेक्स 76,550 वर; 2,990 शेअर्समध्ये मोठी घसरण

दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास सेन्सेक्स 1,607 अंकांच्या घसरणीसह 76,550 च्या पातळीवर ट्रेड करत होता, तर निफ्टी 500 अंकांनी घसरून 24,000 च्या खाली गेला. या मोठ्या घसरणीमुळे बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 471.49 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. बाजारातील या घसरणीचे गांभीर्य 'ॲडव्हान्स-डिक्लाइन रेशो'वरून स्पष्ट होते. एकूण व्यवहार झालेल्या 4,324 शेअर्सपैकी केवळ 1,135 शेअर्समध्ये वाढ झाली, तर तब्बल 2,990 शेअर्स लाल रंगात म्हणजेच घसरणीसह बंद झाले. बाजारातील या गोंधळात 127 शेअर्सनी अप्पर सर्किट तर 194 शेअर्सनी लोअर सर्किट गाठले.

रिलायन्स, मारुती सुझुकीसह दिग्गज शेअर्सना फटका

बाजारातील या मोठ्या पडझडीत आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सना जोरदार फटका बसला. हिंदुस्तान युनिलिव्हर, इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांनी घसरले. तर रिलायन्स डस्ट्रीज, आयटीसी, आयसीआयसीआय बँक आणि बजाज फायनान्स यांसारख्या हेवीवेट शेअर्समध्येही 1 टक्के पेक्षा जास्त घसरण नोंदवली गेली.

हेही वाचा – Railway Ticket Rules: रेल्वे प्रवाशांसाठी मोठा झटका! व्हॉट्सअ‍ॅपवरील तिकीट किंवा स्क्रीनशॉट दाखवल्यास होणार दंडात्मक कारवाई

गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण 

बाजारातील वाढती जोखीम आणि गुंतवणूकदारांमधील घबराट मोजणारा 'India VIX' निर्देशांक थेट 24.53 टक्के ने वधारून 14.50 च्या पातळीवर पोहोचला. क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार केला तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि संभाव्य महागाईच्या भीतीने 'निफ्टी एफएमसीजी' आणि 'निफ्टी ऑईल अँड गॅस' निर्देशांकांना सर्वाधिक फटका बसला असून, हे दोन्ही निर्देशांक 1 टक्के पेक्षा जास्त घसरले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number