सचिन वाझे निलंबित असताना त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यामुळे विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनायलाने सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत कसे घेतले?, असा सवाल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना विचारला असता, त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेण्यासाठी ३ मंत्र्यांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या तीन मंत्र्यांचा समावेश असून वाझेसाठी पोलिसांचाही दबाव होता, असा जबाब परमबीर सिंह यांनी आरोपपत्रात नोंदविला आहे.
सक्तवसुली संचलनालयाने अनिल देशमुखांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात देशमुखांनी अनिल परबांवर आरोप केले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब पोलिस बदल्यांची यादी द्यायचे, असा देशमुखांनी परबांवर केला आहे. तसेच परब यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात दिलेली यादी मी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे अनिल देशमुखांनी म्हटले आहे.