Syria Violence: गेल्या दोन दिवसांत सीरियामध्ये झालेल्या भीषण हिंसाचारात 1000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. बशर अल-असद सरकारने सत्ता सोडल्यानंतर सीरियामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला हिंसाचार थांबला होता. परंतु काही दिवसांच्या शांततेनंतर, देश पुन्हा एकदा हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सीरियन सुरक्षा दल आणि माजी अध्यक्ष बशर अल-असद यांच्या समर्थकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. सीरियातील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेने म्हटले आहे की, 745 नागरिकांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्याही जास्त आहे.
अनेकांना फाशी देण्यात आली –
अहवालांनुसार, अनेक नागरिकांना फाशी देण्यात आली, तर काहींना क्रूरपणे मारण्यात आले. तसेच महिलांना रस्त्यावर नग्न फिरण्यास भाग पाडण्यात आले. याशिवाय, कुटुंबातील सदस्यांना एकमेकांवर गोळ्या घालण्यास सांगण्यात आल्या. सीरियन गृहयुद्धाच्या 14 वर्षांच्या इतिहासातील या दोन दिवसांच्या हिंसाचाराचे वर्णन सर्वात घातक म्हणून केले जात आहे.
हेही वाचा – अमेरिकेतील हिंदू मंदिरावर हल्ला- भिंतींवर भारतविरोधी लिखाण, हिंदूंना परत जाण्याचा इशारा!
रस्त्यावर वाहत आहेत रक्ताच्या नद्या –
गुरुवारी सीरियाच्या लताकिया प्रांतातील जबालेह येथे असद समर्थक आणि नवीन सुरक्षा दलांमध्ये प्राणघातक संघर्ष झाला. वृत्तानुसार, सुरक्षा दलांवर हल्ला करण्यात आला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. सीरियन ऑब्झर्व्हेटरीनुसार, हिंसाचारात 125 सुरक्षा दल आणि 148 असद समर्थकही मारले गेले. टार्टस आणि लताकिया प्रांतांमध्ये सरकार समर्थक मिलिशियाने 45 अलावी नागरिकांना लक्ष्य केले.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अनेक नागरिकांना त्यांच्या घरातून बाहेर काढून गोळ्या घालून ठार मारण्यात आले. असाद समर्थकांनी घरे लुटले आणि घरांना आग लावली. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सीरियन सरकारने या भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते हसन अब्दुल गनी म्हणाले की, हिंसाचारग्रस्त भागांवर लष्कराने पुन्हा नियंत्रण मिळवले आहे.
महिला आणि मुलांसोबत क्रूर कृत्य –
सीरियातील हिंसाचारात महिला आणि मुलांनाही लक्ष्य करण्यात आले. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, महिलांना जबरदस्तीने रस्त्यावर नग्न फिरायला लावले जात होते. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, एका किशोरवयीन मुलाला रायफल देण्यात आली आणि त्याला स्वतःच्या कुटुंबावर गोळीबार करण्यास भाग पाडण्यात आले. बनियास येथील रहिवासी समीर हैदर यांनी एएफपीला सांगितले की, सशस्त्र गटांनी त्यांचे भाऊ आणि भाची यांची हत्या केली.
अलावी समुदायावर हल्ला –
दरम्या्न, लताकिया आणि टार्टस प्रांतांमध्ये राहणाऱ्या अलावी समुदायाला विशेषतः लक्ष्य केले जात आहे. हे समुदाय दीर्घकाळापासून असद कुटुंबाचे समर्थक आहेत. वृत्तानुसार, सुन्नी अतिरेक्यांनी बदला म्हणून अलावी नागरिकांना मारण्यास सुरुवात केली आहे. सीरियामध्ये पसरलेल्या या अराजकतेबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायही चिंतेत आहे. ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीने या संकटावर चिंता व्यक्त केली आहे आणि सर्व पक्षांना हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे.