ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराजवळील बोंडी बीच परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर देशात खळबळ उडाली आहे. या घटनेत 12 हून अधिक ज्यू नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यामागे ऑस्ट्रेलियातील वाढते ज्यूविरोधी वातावरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय राजकीय संदर्भ प्राप्त होत असल्याचे चित्र आहे.
घटनेनंतर न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन हल्लेखोरांपैकी एकाला घटनास्थळीच ठार केले, तर नवीद अक्रम नावाच्या 24 वर्षीय संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात पिता-पुत्र सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.
हेही वाचा: Sydney Bondi Beach Attack : सिडनी गोळीबारात बंदूक हिसकावून घेऊन जीव वाचवणारा माणूस कोण ?
गजबजलेल्या पर्यटनस्थळी ही घटना घडल्याने सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यावर टीका करत, देशातील काही धोरणांमुळे ज्यूविरोधी भावना बळावत असल्याचा दावा केला.
नेतन्याहू यांच्या मते, अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्यास समाजात द्वेष अधिक वाढू शकतो. नेतन्याहू यांनी यापूर्वीही ऑस्ट्रेलियन नेतृत्वाला पत्राद्वारे इशारा दिल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यूविरोध हा गंभीर सामाजिक प्रश्न असून त्यावर वेळेत आणि ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम समाजावर होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेनंतर ऑस्ट्रेलियातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे पाहिले जात असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही याची दखल घेतली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या गोळीबारामागील नेमकी कारणे स्पष्ट होतील, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: Sydney Mass Shooting: सिडनी हल्ल्याचं पाकिस्तान कनेक्शन; संशयिताची ओळख पटली