CJI Surya Kant on Banke Bihari Temple : उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील जगप्रसिद्ध बांके बिहारी मंदिरातील दर्शनाच्या वेळा आणि विशेष पूजेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. श्रीमंत भाविकांकडून पैसे घेऊन केल्या जाणाऱ्या विशेष पूजेमुळे देवाला विश्रांतीसाठी एक मिनिटाचाही वेळ मिळत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रथेवर टीका करताना म्हटले की, केवळ विशेषाधिकार असलेल्या लोकांसाठी मंदिराच्या पुरातन परंपरा मोडीत काढल्या जात आहेत.
बालस्वरूपातील कृष्णाच्या विश्रांतीत अडथळा
बांके बिहारी मंदिरात भगवान श्रीकृष्ण हे बालरूपात विराजमान आहेत, अशी श्रद्धा आहे. या परंपरेनुसार, एका लहान मुलाप्रमाणेच देवालाही थकवा जाणवतो आणि त्यांना आरामाची गरज असते, असे मानले जाते. म्हणूनच दुपारी आणि रात्री ठराविक काळ मंदिर दर्शनासाठी बंद ठेवून देवाला विश्रांती दिली जाते. मात्र, काही काळापासून मंदिराच्या प्रशासनाने श्रीमंत लोकांसाठी दुपारच्या वेळीही विशेष पूजा सुरू केल्याने, देवाच्या विश्रांतीच्या वेळेवर गदा आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत विचारले की, "तुम्ही देवाचेही शोषण करणार का?"
वेळापत्रकातील बदल आणि वादाचे मूळ
मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीने अलीकडेच भाविकांच्या सोयीसाठी सकाळी आणि सायंकाळी दर्शनाची वेळ 1 तासाने वाढवली आहे. हे नवीन वेळापत्रक साधारणपणे 2 महिन्यांपूर्वी लागू करण्यात आले. मात्र, या निर्णयामुळे गोस्वामी समाजातील पूजाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांच्या मते, दर्शनाचा वेळ वाढवल्यामुळे बालस्वरूपातील कृष्ण थकतात. सध्याच्या नियमानुसार मंदिर सकाळी 7.30 ते दुपारी 12 पर्यंत उघडे असते, पण नव्या बदलांमुळे देवाच्या नैवेद्य आणि निद्रेच्या वेळा विस्कळीत झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाची उत्तर प्रदेश सरकारला नोटीस
या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पार पडली. न्यायालयाने या गंभीर विषयाची दखल घेत उत्तर प्रदेश सरकार आणि मंदिर प्रशासन समितीला नोटीस बजावली आहे. गोस्वामी समाजाने मंदिराच्या देखभालीच्या अधिकारांबाबत ही याचिका दाखल केली असून, यावर सविस्तर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
पुढील सुनावणीची तारीख
मंदिरातील पूजा आणि व्यवस्थापनाच्या अधिकारांमधील बदलांमुळे हा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. भाविकांची गर्दी आणि सोय महत्त्वाची असली तरी, मंदिराच्या धार्मिक परंपरांचे संरक्षण होणेही तितकेच आवश्यक असल्याचे न्यायालयाने सूचित केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता जानेवारी 2026 च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
हेही वाचा – Viksit Bharat G RAM G Scheme: मनरेगा योजनेचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखली जाणार योजना
इतिहासात प्रथमच नैवेद्यही वेळेवर नाही
दरम्यान, बांके बिहारी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच नियोजित वेळेपेक्षा सुमारे दीड तास उशिराने 'बालभोग' अर्पण करण्याची दुर्दैवी घटना घडली. हिवाळ्यात सकाळी 8.30 वाजता अर्पण केला जाणारा हा नैवेद्य, व्यवस्थापन समितीने नियुक्त केलेल्या आचाऱ्याचे देयक (पेमेंट) थकल्यामुळे वेळेत तयार होऊ शकला नाही. दोन मिठाई आणि दोन नमकीन पदार्थांचा समावेश असलेला हा भोग सकाळी 10 वाजता अर्पण करण्यात आला. समिती सदस्यांच्या हस्तक्षेपानंतर आचाऱ्याने नैवेद्य बनवला असला, तरी राजभोग आणि शयन भोगापूर्वीच्या या महत्त्वाच्या विधीमध्ये विलंब झाल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.