एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उच्च न्यायालयाने संपकारी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी देण्याचे आदेशही एसटी महामंडळाला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा सुटला आहे. दरम्यान, बुलडाण्यातील कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आला असून बुलडाण्यात गुरुवारी लालपरी रस्त्यावर आली आहे.
बुलडाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असून आजपासून संपावर गेलेले कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली असून प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात संप सुरू होता. मात्र, न्यायालयाने विलिनीकरण शक्य नसल्याचे सागंत २२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले. त्यानंतर बुलडाण्यात गुरूवारी २१ एप्रिललाच एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने कामावर रुजू झाले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लालपरी रस्त्यावर धावत नाही आहे. राज्यात अनेक ठिकाणी एसटी बस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांना प्रवास करण्यासाठी इतर खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच हे वाहनचालक प्रवाशांकडून कमी अंतराच्या प्रवासासाठीदेखील जास्तीचे पैसे आकारत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खीशाला कात्री लागत आहे.
दरम्यान, बुलडाण्यात संपकारी एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे गुरुवारी बुलडाण्यात लालपरी रस्त्यावर आली आहे. एसटी बससेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.