दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता रवि प्रकाश सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. साऊथ सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर आता तो मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या आगामी ‘दशमी’ या मराठी सिनेमात रवि प्रकाश महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील भूमिकेसाठी रवि प्रकाशने मराठी भाषा शिकण्याची मेहनत घेतली. मराठी शिकण्यासाठी त्याने चक्क मराठी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका पाहण्याचा मार्ग निवडला. विशेष म्हणजे ही मालिका सध्या त्याच्या मराठी शिकण्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे.
‘ही’ मालिका पाहून शिकला मराठी
‘दशमी’च्या पोस्टर लाँच सोहळ्यात रवि प्रकाशने मराठी शिकण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल खुलासा केला. मराठी भाषा आत्मसात करण्यासाठी आपण ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मराठी मालिका पाहायला सुरुवात केल्याचं त्याने सांगितलं. रवि प्रकाशच्या म्हणण्यानुसार, तो शूटिंगच्या सेटवर लॅपटॉपवर ही मालिका पाहायचा. विशेष म्हणजे एकदा ही मालिका पाहत असतानाच त्यातील अभिनेते प्रसन्न केतकर अचानक त्याच्या सेटवर आले. त्यामुळे लॅपटॉपवर दिसणारा कलाकार प्रत्यक्षात समोर पाहून रवि प्रकाशला आश्चर्याचा धक्काच बसला. याशिवाय एका कार्यक्रमादरम्यान ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा अभिनेता विजय आंदळकर याचीही भेट झाल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे या मालिकेतील कलाकारांशी त्याचा प्रत्यक्ष परिचयही झाला. रवि प्रकाशने सांगितलं की, सध्या मराठी शिकण्यासाठी तो कोणती मालिका पाहत असेल, तर ती ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ हीच आहे. मालिकेतील संवाद आणि कलाकारांचं बोलणं ऐकून मराठी समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितलं.
‘दशमी’मध्ये दिग्गज कलाकारांची फौज
दिग्दर्शक योगेश भोसले यांच्या ‘दशमी’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. योगेश भोसले यांनी यापूर्वी ‘मंगलाष्टक रिटर्न्स’, ‘बाजार’ आणि ‘आम्ही जरांगे’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. आता ‘दशमी’च्या माध्यमातून ते नवी कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. या सिनेमाच्या पोस्टर लाँच सोहळ्याला रवि प्रकाशदेखील उपस्थित होता. त्यामुळे साऊथ आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या या अनोख्या संगमाची विशेष चर्चा रंगली आहे. ‘दशमी’मध्ये महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, देवेंद्र गायकवाड, प्रसन्न केतकर, गौरी इंगवले आणि रवि प्रकाश यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘दशमी’ची भेट
रवि प्रकाश अभिनीत ‘दशमी’ हा सिनेमा दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे. या सिनेमासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ रवि प्रकाशने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. साऊथचा लोकप्रिय अभिनेता मराठी सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसणार, तसेच मराठी भाषा शिकण्यासाठी त्याने केलेली ही खास तयारी पडद्यावर कशी दिसणार, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.