नागपूर महानगर पालिकेची परिवहन सेवा म्हणजे ‘आपली बस’ अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असते. संप ठरलेला असतो आणि त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो… त्यामुळे महापालिकेने यावर कायम स्वरूपी तोडगा काढत परवानगी शिवाय संप करणाऱ्या चालक आणि वाहकांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर शहराची जीवनवाहिनी म्हणजे ‘आपली बस’, सामान्य माणसाला प्रवासासाठी महत्वाचं साधन… कमी पैशात शहराच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जाता येतं. सामान्य माणसाला परवडत असल्याने तो जास्तीत जास्त ‘आपली बस’ने प्रवास करतो. हे सगळं खरं असलं तरी शहर बस चालविण्याचं कंत्राट शहरात वेगवेगळ्या तीन कंपन्यांना देण्यात आल आहे. त्यामुळे कुठे तिकीटाचा वाद, चालक वाहकांच्या पगाराचा प्रश्न, किंवा मग प्रवाश्यांसोबत झालेली बाचाबाची असं काहीही घडलं की चालक, वाहक संप पुकारून रस्त्यावर बस उभ्या करून देतात. या संपाचा त्रास सामान्य प्रवाश्यांना होतो. त्यामुळे जर असा अचानक संप पुकारण्यात आला तर संपकरी कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात येणार आहे.
शहरात 300 च्या वर बसेस धावतात. मात्र संप झाला की सगळ्या बंद होतात. बस बंद झाल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागला. यावर परिवहन समितीने तोडगा काढण्याचं ठरवलं आणि त्यांच्या नियमित मागण्या जवळपास पूर्ण केल्या आहेत. ज्यात साप्ताहिक सुट्ट्या, वर्षाच्या पगारी सुट्या, बोनस आदींचा समावेश आहे. तसंच कडक नियम देखील बनविले आहेत.
कुठलंही कारण न देता जर संप पुकारला आणि बस बंद ठेवली तर आंदोलन करणाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ केलं जाणार आहे. महापालिकेने हा निर्णय घेऊन नागरिकांना एक प्रकारे दिलासा दिला. मात्र हा दिलासा कधीपर्यंत चालेल आणि नागरिकांच्या अडचणी दूर होतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे.