हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर बांगर यांनी शनिवारी हिंगोलीत शिवसेनिकांशी सवांद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ”गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा.”
ते पुढे म्हणाले की, आम्ही घाबणारे शिवसैनिक नाही. आमच्या हातात बांगड्या नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी आरे म्हंटले तर त्याला कारे नाही तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाहीत. असे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहोत.
दरम्यान संतोष बांगर हे शिंदे गटात गेलेले शेवटचे आमदार आहेत. सरकारच्या बहुमत चाचणीनंतर त्यांनी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसहित शक्तिप्रदर्शन केलं होतं. पण परत ते आपल्या हिंगोली या मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांकडून त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या तोंडातून हिंसेची भाषा येऊ लागली आहे.