Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून शो सुरू होण्याआधीच मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. संभाव्य स्पर्धकांची नावं सोशल मीडियावर व्हायरल होत असताना अभिनेता श्रेयस तळपदे बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याच्या चर्चांनी विशेष जोर धरला होता. मात्र आता या चर्चांवर स्वतः श्रेयस तळपदे यांनी स्पष्ट भूमिका मांडत अखेर मौन सोडलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, फॅन पेजेस आणि मनोरंजन पोर्टल्सवर श्रेयस तळपदे बिग बॉस मराठी 6 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याच्या बातम्या झळकत होत्या. लोकप्रिय अभिनेता असल्यामुळे आणि त्याची विनोदी, समंजस व्यक्तिमत्त्वाची प्रतिमा पाहता प्रेक्षकांमध्येही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. काही चाहत्यांनी तर श्रेयस बिग बॉसच्या घरात कसा खेळ खेळेल, कोणत्या स्पर्धकांसोबत त्याची जुळवाजुळव होईल, यावर अंदाज बांधायला सुरुवात केली होती.
मात्र या चर्चांना पूर्णविराम देत श्रेयस तळपदे यांनी आपण बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या बातम्यांना निराधार अफवा असल्याचं म्हटलं. “आजकाल कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय अशा गोष्टी पसरवल्या जातात. या अफवांकडे दुर्लक्ष करा. कलाकार हे अनेकदा अशा गोष्टींचे सहज बळी ठरतात,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
श्रेयस यांच्या या वक्तव्यानंतर ते बिग बॉस मराठी 6 च्या घरात जाणार नसल्याचं स्पष्ट झालं असून त्यांच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली असली तरी अफवांवर पडदा पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉस मराठी सुरू होण्याआधी अनेक सेलिब्रिटींची नावं संभाव्य स्पर्धक म्हणून पुढे येत आहेत. मात्र त्यातील अनेक नावं ही केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी 6 बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख करणार असून ‘भाऊ’च्या स्टाईलमध्ये तो स्पर्धकांची कशी शाळा घेणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. घरात कोणते चेहरे जाणार, कोणता खेळ रंगणार आणि यंदाचा सीझन किती धमाकेदार असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
श्रेयस तळपदे घरात जाणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता प्रश्न एकच बिग बॉस मराठी 6 च्या घरात नेमके कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार? याचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार असून, तोपर्यंत चर्चांचा आणि उत्सुकतेचा सिलसिला सुरूच राहणार आहे.