अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरम्याने या टीझरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे.
या चित्रपटातील श्रद्धाचा लूक अतिशय प्रभावी आहे, परंतु आता या चित्रपटाला वाढत्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्वाचा चित्रपटाच्या प्रदर्शनावरही परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हा चित्रपट त्याच्या कथानकापेक्षा शीर्षकावरूनच एका मोठ्या वादात सापडला आहे. महाराष्ट्रातील राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात या चित्रपटाच्या नावाबाबत विरोधाचे सूर तीव्र झाले आहेत. याव्यतिरिक्त, विठाबाईंच्या कुटुंबीयांनीही या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप नोंदवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने 'ईठा' या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, हे शीर्षक महाराष्ट्रातील 'तमाशा' या लोककलेतील दिग्गज कलाकार आणि प्रसिद्ध 'लावणी' नृत्यांगना विठाबाई नारायणगावकर यांच्या ऐतिहासिक वारशाला आणि योगदानाला न्याय देत नाही. जर हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असेल, तर त्याचे शीर्षक 'ईठा' ऐवजी 'विठा' असायला हवे, असा युक्तिवाद पक्षाने केला आहे.