महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. शिवसेनेचे नेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी मविआमधील नेत्यांवर आयकर विभागाची धाड पडत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या घरी सीपीआरएफ जवान आणि ईडीचे पथक दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांनुसार मिळाली आहे.
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तसेच यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून १ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. यामिनी जाधव यांनी कर्ज घेतले नसून हे पैसे त्यांचेच असल्याचे आयकरविभागाचे म्हणणे आहे. तसेच इतर आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती जाधव कुटुंबियांनी लपवली असल्याचा संशय आयकर विभागाला आहे.