मुंबई: आठवड्याच्या चौथ्या व्यवहारदिवशी गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने मजबूत सुरुवात नोंदवली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ( Bombay Stock Exchange, BSE) चा 30 समभागांचा सेन्सेक्स 146 अंकांनी, म्हणजेच 0.17 टक्क्यांनी वाढून 83,880 वर उघडला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चा निफ्टी 50 निर्देशांक 19 अंकांनी, म्हणजे 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 25,839 वर व्यवहाराला सुरुवात केली. विस्तृत बाजारातही सकारात्मक कल दिसून आला असून निफ्टी मिडकॅप 100 मध्ये 0.02 टक्क्यांची तर निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये 0.17 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.
आशियाई बाजारांतही तेजीचे वातावरण होते. वॉल स्ट्रीटवरील वाढीनंतर जपानचा निक्केई 225 निर्देशांक 0.52 टक्क्यांनी वधारला, तर टॉपिक्समध्ये 0.39 टक्क्यांची वाढ झाली. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 2.76 टक्क्यांनी उसळून विक्रमी उच्चांकावर पोहोचला. कोस्डॅक निर्देशांकात 0.59 टक्क्यांची वाढ झाली. लूनर न्यू इयरच्या सुट्टीमुळे हाँगकाँग आणि चीनमधील बाजार बंद होते.
दरम्यान, अमेरिकन शेअर बाजार बुधवारी वाढीसह बंद झाला. एसअँडपी 500 निर्देशांक 0.56 टक्क्यांनी वाढून 6,881.31 वर स्थिरावला. नॅस्डॅक कंपोझिट 0.78 टक्क्यांनी वाढून 22,753.63 वर बंद झाला. डॉव जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज 129.47 अंकांनी, म्हणजे 0.26 टक्क्यांनी वाढून 49,662.66 वर पोहोचला. गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या नोंदींकडे होते.
18 फेब्रुवारी रोजी अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या मागील महिन्यातील बैठकीच्या नोंदी प्रसिद्ध करण्यात आल्या. या नोंदींमध्ये व्याजदर धोरणाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेडच्या अधिकाऱ्यांनी आगामी काळात व्याजदरात तातडीने बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत. महागाईच्या प्रवाहाचे निरीक्षण केल्याशिवाय दरकपातीचा निर्णय घेतला जाणार नाही, असे मत बहुतेक सदस्यांनी व्यक्त केले आहे.
27 आणि 28 जानेवारीला झालेल्या बैठकीत दोन सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तर काही सदस्यांनी दरकपात आणि दरवाढ या दोन्ही शक्यता समसमान असल्याचे मत व्यक्त करत तटस्थ भूमिका घेतली. एकूणच जागतिक संकेत सकारात्मक असले तरी पुढील धोरणात्मक निर्णयांवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!