लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून विविध पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असतात. विदर्भ – मराठवाड्यातील छोट्या मोठ्या जवळपास २०० पालख्या परभणी जिल्ह्यातून जातात. त्यांचा या मार्गावर विसावा असतो तो गंगाखेडच्या संत जनाबाई मंदिरात आणि याच ठिकाणी विसाव्याला आलेल्या वारकऱ्यांची सेवा गंगाखेडमधील सवंगडी कट्टा करतो. इथे येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या पायांची मालिश, त्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी इथे केली जाते.
गंगाखेड शहरातील सवंगडी कट्ट्याच्या अनेक तरुण आणि तरुणींनी एकत्र येत स्वखर्चातून निधी उभारत पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांची अनोखी सेवा करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम ८ वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व दिंड्या ह्या गंगाखेडमधील संत जनाबाई मंदिरात विसाव्याला थांबतात. रात्री या दिंड्या आल्यानंतर प्रत्येक वारकऱ्यांचे स्वागत केले जाते. चालून थकलेल्या महिला, पुरुष, तरुण वारकऱ्यांचे कुणी पाय दाबत, कुणी तळपायांची मालिश करत, कुणी डोकं दाबून देतं अशा अनेक प्रकारे हे तरुण या वारकऱ्यांची सेवा करतात. नंतर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते.