नवी दिल्ली: सौदी अरेबियातील भीषण बस अपघाताने देशभरात दु:खाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की रियाधमधील भारतीय दूतावास आणि जेद्दामधील भारतीय वाणिज्य दूतावास पीडित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करत आहेत, ही मन हेलावून टाकणारी घटना आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना शोकसंवेदना व्यक्त करताना त्यांनी जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थनाही केली.
Deeply shocked at the accident involving Indian nationals in Medinah, Saudi Arabia. Our Embassy in Riyadh and Consulate in Jeddah are giving fullest support to Indian nationals and families affected by this accident. Sincere condolences to the bereaved families. Pray for the… — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) November 17, 2025
अपघात सोमवार पहाटे सुमारे 1.30 च्या सुमारास झाला. उमरा यात्रा पूर्ण करून यात्रेकरू मक्का येथून मदीनाकडे परतत असताना त्यांची बस एका वाहनाला धडकली आणि काही क्षणातच भीषण आग लागली. बसमध्ये बहुतेक प्रवासी झोपेत असल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत. प्राथमिक अहवालांनुसार या भीषण दुर्घटनेत 42 जणांचा मृत्यू झाला असून यात 20 महिला आणि 11 मुलांचा समावेश आहे. बहुतांश मृत नागरिक हे हैदराबादमधील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर जेद्दामधील भारतीय वाणिज्य दूतावासाने तात्काळ 24×7 नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. नातेवाईकांशी संपर्क साधणे, रुग्णालयांची माहिती देणे आणि स्थानिक सौदी अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते सतत सऊदी प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि प्रत्येक माहिती गोळा करत आहेत. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघातातील अनेक बळी हैदराबादचे असल्याची माहिती मिळताच त्यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि रियाधमधील भारतीय दूतावासाशी समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले. राज्याच्या मुख्य सचिव ए. शांती कुमारी यांनी नवी दिल्लीतील रेसिडेंट कमिशनर गौरव उप्पल यांना वारंवार संपर्कात राहून राज्यातील किती प्रवासी या बसमध्ये होते याची अचूक माहिती गोळा करण्यास सांगितले. राज्य सचिवालयातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी केंद्र सरकारला मृतांच्या पार्थिवांचे त्वरीत भारतात आणण्याची विनंती केली. ओवेसी यांनी रियाधमधील भारतीय दूतावासातील डेप्युटी चीफ ऑफ मिशन अबू मॅथन जॉर्ज यांच्याशी बोलून हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सीकडून मिळालेली प्रवाशांची माहिती त्यांच्यासोबत शेअर केली. त्यांनी परराष्ट्र सचिवांशीही संपर्क साधून सर्व तपशील पुरवले. ओवेसी यांनी सांगितले की अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 42 जण प्रवास करत होते आणि बस मक्का ते मदीना या मार्गावर होती. स्थानिक अधिकाऱ्यांकडून जखमी आणि मृतांची अंतिम संख्या, तसेच वाचलेल्या प्रवाशांची माहिती येणे अद्याप बाकी आहे.