गेल्या सहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षणाच्या या सुनावणीपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत एक शेर ट्विट केले आहे. ‘मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए… नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है’, अशा आशयाचा हा शेर आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आज संजय राऊत यांना अपेक्षित अशा गोष्टी घडणार का, हे पाहावे लागेल.
Good morning..
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/C8TWz86FcW — Sanjay Raut (@rautsanjay61) January 10, 2023
सरन्यायाधीश वाय.एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर आजची सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाने नबम रेबिया प्रकरणाचा दाखला देत हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडे सोपवले जावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय ही मागणी मान्य करणार का, हे पाहावे लागेल. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने ठाकरे आणि शिंदे गटाला आपले म्हणणे लिखीत स्वरुपात मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज न्यायालयात प्रत्यक्ष युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. या खटल्याची सुनावणी आतापर्यंत अनेकदा लांबणीवर पडली आहे. अनेक कायदेशीर पेच उद्भवल्याने या खटल्याची सुनावणी संथगतीने सुरु आहे. मध्यंतरीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला देऊ केला होता. त्यामुळे शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले गेले होते.
शिवसेना पक्ष हा नेमका कोणाचा हा वाद सुरु असताना शिंदे गट सातत्याने याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत, असा दावा करत आहे. महाविकास आघाडीच्या काळातील विधानसभा उपाध्यक्ष आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराच्या मुद्द्यावरुनही दोन्ही पक्षांकडून परस्परांविरोधात युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार, हे पाहावे लागेल. आज दुपारी १२ नंतर याप्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.