चेन्नईचे डीजीटीएस अतिरिक्त आयुक्त समीर वानखेडे यांचा संघ मुख्यालयाचा दौरा वादात सापडला आहे. समीर वानखेडे यांनी संघ मुख्यालयाचा दौरा केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, ‘न्यूज डंका’ वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेल्या मुलाखतीत समीर वानखेडे यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
‘मी हिजबुल मुजाहिदीनच्या शिबिरात नाही तर, संघ मुख्यालयात गेलो होतो, असे म्हणत संघ मुख्यालयाचा दौरा गैर नसल्याचे समीर वानखेडे म्हणाले.’ तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरूजी ही देश घडवणारी माणसं होती, असेही वानखेडे म्हणाले.
संपादक दिनेश कानजी यांनी घेतलेल्या मुलाखतीत वानखेडे यांनी संघ मुख्यालयाच्या दौऱ्याबाबत होणाऱ्या चर्चेला उत्तर दिले. ‘माझ्या दौऱ्याबाबत चर्चा झाली तर होऊ दे. संघाचे आणि माझे जुने संबंध आहेत. बालपणी शिवडीत राहताना संघाच्या शाखेतही जायचो. तर माझ्या मुलांवरही हेच संस्कार व्हावे, असे वाटत असल्याचे समीर वानखेडे म्हणाले.’
वानखेडे म्हणाले, ‘माझ्यावर टीका केली ते कोण आहेत, कुठे आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मी डोंगरीत असताना दाऊदची टोळी उद्ध्वस्त केली. दाऊदच्या भावाला अटक केली. त्यामुळे त्याचे साथीदार माझ्यावर टीका करणारच, असे वानखेडे म्हणाले.’
तसेच, ‘डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणे यात काहीही गैर नाही. ही दोन्ही मोठी व्यक्तिमत्त्व आहेत. देशाच्या जडणघडणीत त्यांची भूमिका मोठी आहे. हे दोघेही माझे महापुरुष असून माझे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतीस्थळाला नमन करण्याची माझी आणि क्रांतीची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. तर स्मृतीस्थळाला भेट देण्यास उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही, असेही वानखेडे म्हणाले.’
‘संघ मुख्यालयाचा दौरा उत्तम होता. यावेळी मी संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेथील वाचनालयात गेलो. संघ कार्य, क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील योगदान, ऐतिहासिक पुरुष अशा विषयांवर भरपूर पुस्तकंही विकत घेतली. तसेच इथल्या वातावरणात सकारात्मकता जाणवली असल्याचेही वानखेडे म्हणाले.’