राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर ट्विटरबाजी सुरूच आहे. नवाब मलिकांनी आता समीर वानखेडे यांच्या जातीवर प्रश्न उपस्थित केला आहे. यावर समीर वानखेडे हे हिंदूच आहेत आणि हे नाकारले जाऊ शकत नाही, असे उत्तर समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी दिले आहे.
नवाब मलिकांच्या आरोपावर क्रांती रेडकर म्हणाल्या, ‘जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत आणि ते नाकारले जाऊ शकत नाही. नवाब मलिकांनी कोर्टात जावे. नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेले आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू-महार असल्याचे प्रमाणपत्र सासऱ्यांनी दाखवले आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केले आहेत ते कोर्टात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे त्यानुसार असेच वाटते की मंत्रिपदाशी काही देणंघेणं नाही.’
मलिकांनी निकाहनामा जारी केल्यानंतर समीर वानखेडे यांनी धर्म बदलला आहे का? मी जन्माने हिंदू आहे आणि आताही आहे. मुस्लीम मुलीशी लग्न केल्याने मुस्लीम होतो का? असा सवालही क्रांती रेडकर यांनी केला आहे. तसेच नवाब मलिकांना कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ असे सांगत त्यांनी समीर वानखेडेंच्या वडिलांचे जात प्रमाणपत्रही सर्वांसमोर दाखवले.