नवी दिल्ली: जागतिक ऊर्जा राजकारण अधिक गुंतागुंतीचे होत असताना रशियाने भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. भारताला पाठवण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचे अचूक आकडे सार्वजनिक केले जाणार नसल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. रशियन राष्ट्रपती कार्यालय ‘क्रेमलिन’चे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, काही स्पष्ट कारणांमुळे या व्यवहाराची माहिती गुप्त ठेवली जाईल. त्यांच्या मते, ऊर्जा व्यापाराशी संबंधित माहिती जाहीर केल्यास त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणारे आणि वाईट चिंतणारे अनेक घटक सक्रिय होऊ शकतात.
ही भूमिका अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिफायनरी कंपन्यांना रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची तात्पुरती सवलत देण्यात आल्याचा उल्लेख केला होता. या निर्णयामागे जागतिक ऊर्जा बाजारातील वाढता ताण कमी करण्याचा उद्देश असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, भारतातील काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये रशिया एका आठवड्यात भारताला सुमारे दोन कोटी 20 लाख बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याची क्षमता ठेवतो, असा दावा करण्यात आला होता. या संदर्भात प्रतिक्रिया देताना पेस्कोव्ह यांनी निर्यातीच्या अचूक आकड्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित तपशील जाहीर करणे योग्य ठरणार नाही.
याआधी रशियाच्या सरकारी दूरदर्शन वाहिनीने एक नकाशा प्रसारित केला होता, ज्यामध्ये अरब सागरातून बंगालच्या उपसागराकडे सरकणाऱ्या अनेक तेलवाहू टँकर्सचा उल्लेख करण्यात आला होता. हे टँकर्स भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या रिफायनरींकडे जात असल्याचे संकेत त्या अहवालात देण्यात आले होते. तसेच रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनीही स्पष्ट केले की त्यांचा देश भारत आणि चीन या दोन्ही देशांना कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी तयार आहे.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर झालेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. त्यानंतर इराणने आपल्या नियंत्रणाखालील होर्मूज सामुद्रधुनी बंद केल्याची माहिती समोर आली. ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक मानली जाते, कारण जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के तेल या मार्गातून वाहतूक केले जाते.
या घडामोडींमुळे जागतिक तेल बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक देश पर्यायी पुरवठा मार्ग आणि स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने भारतीय रिफायनरी कंपन्यांना रशियन तेल खरेदीसाठी 30 दिवसांची तात्पुरती परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी रशियाकडून तेल खरेदीवर निर्बंध घालण्याबाबत चर्चा होती. मात्र सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत काही धोरणात्मक सवलती देण्याची भूमिका स्वीकारली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.