लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले हिचा कार अपघात झाला आहे. आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली रुपाली सध्या लपंडाव या मालिकेत सरकार ही नकारात्मक भूमिका साकारत आहे. अभिनयासोबत वैयक्तिक आयुष्यातही तिने नवे टप्पे गाठले होते. काही दिवसांपूर्वीच तिने आलिशान घर घेतलं आणि त्यानंतर मर्सिडीज बेन्झ कार खरेदी करून चाहत्यांसोबत तो आनंद शेअर केला होता. पण आता तिच्या त्या नव्या गाडीचा अपघात झाला आहे.
रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. तिने शेअर केलेल्या व्हिडिओत अपघातानंतर कारचं बोनेट डॅमेज झालेलं स्पष्ट दिसत आहे. मात्र हा अपघात नेमका कसा घडला याविषयी सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. “Accident झाला, वाईट दिवस” अशा शब्दांत रुपालीने हा व्हिडिओ पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली.
कार खरेदी करतानाचा तिचा आनंद तिने खास कॅप्शनसह शेअर केला होता. तिने लिहिलं होतं, “एक दिवस मी तुझी मालकीण होईन यासाठी हे स्वप्न सुरू झालं. फक्त स्वप्न पाहू नका, ती जगा. रिस्क घ्या, कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवर विश्वास ठेवा.” या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
अपघातानंतर रुपाली सुखरूप असल्याचं समजतं. मात्र, तिच्या नव्या गाडीचं झालेलं नुकसान चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांनी तिच्या सुरक्षिततेबद्दल दिलासा व्यक्त केला.